नेरूळ सेक्टर सहामधील मार्केटसाठी आरक्षित असलेल्या भुखंडाबाबत सारसोळेच्या ग्रामस्थांची सिडकोकडे मागणी
अमोल इंगळे
नवी मुंबई :नेरूळ सेक्टर सहामधील मार्केटसाठी आरक्षित भुखंडाची विक्री केल्यास त्याचा आजच्या बाजारभावाप्रमाणे मोबदला सारसोळेच्या ग्रामस्थांकडे जमा करण्याची मागणी सारसोळेचे युवा ग्रामस्थ, गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि महापालिका ब प्रभाग समितीचे सदस्य मनोज मेहेर यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडको प्रशासनाने वरूणा आणि एव्हरग्रीन या दोन सिडको सोसायट्यांच्या मध्यभागी असलेल्या मैदानावर भाजी मार्केटसाठी आरक्षित भुखंड ठेवलेला आहे. या भुखंडावर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने भुखंड हस्तांतरीत होण्यापूर्वीच मार्केट बांधल्याने ते मार्केट अनधिकृत ठरले. पर्यायाने हे मार्केट महापालिका प्रशासनाला पाडून टाकावे लागलेे. भाजी मार्केटसाठी आरक्षित असलेला हा भुखंड सिडकोने विकून टाकला अथवा विकणार आहे, अशा विविध बातम्या वर्तमानपत्रात येत असल्याने सारसोळेच्या ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे व संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. मुळातच सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात भाजी मार्केट नसल्याने फेरीविक्रेते मिळेल त्या जागेवर व्यवसाय करत असून त्या अतिक्रमणामुळे परिसराला बकालपणा प्राप्त झालेला आहे. हा भुखंड सिडकोला कोणालाही विकण्याचा प्रथम अधिकारच नाही. या मार्केटच्या भुखंडाच्या जागेवर सर्वप्रथम मालकी हक्क हा सारसोळेच्या आगरी-कोळी समाजाचा व अन्य ग्रामस्थांचा आहे. सारसोळेच्या ग्रामस्थांना साडेबारा टक्केचे भुखंड देताना जे पावणे चार टक्के नागरी सुविधांसाठी कापण्यात आले आहेत, त्यातून या मार्केटसाठीच्या भुखंडाची निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी मार्केट न उभारता सिडको त्या भुखंडाची अन्य कोणाला विक्री करत असेल आणि सिडको त्या भुखंडाची विक्री करावी म्हणून कोणी राजकारणी प्रयत्न करत असेल अथवा राजकीय दबाव आणत असेल तर सिडको व संबंधित राजकारणी सारसोळेच्या ग्रामस्थांचा विश्वासघात करत आहे, अशी आम्हा सारसोळेच्या ग्रामस्थांची धारणा झाली असल्याचे मनोज मेहेर यांनी सिडकोला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मुळातच त्या जागेवर मार्केट उभारायचे नसेल आणि नागरी सुविधा येत नसतील तर तो भुखंड सारसोळेच्या ग्रामस्थांना परत करणे आवश्यक आहे अथवा त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे विक्री करणार असेल तर तो सर्व पैसा सारसोळेच्या ग्रामस्थांना मिळणे आवश्यक असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.
रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली उद्यान व क्रिडांगण कमी करण्याचा राजकीय पातळीवर जोरदार प्रयत्न होत आहे. त्यामध्येही सारसोळेच्या ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नाही. आमच्या साडेबारा टक्केच्या भुखंडातून कापण्यात आलेल्या पावणेचार टक्केमधून शाळा, मैदान, उद्यान, रस्ते या सामाजिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. उद्यान व क्रिडांगण कमी केले जात असेल तर त्याही जागेवर असलेला सारसोळेचा मालकी हक्क लक्षात घेता या जागेचाही बाजारभावाप्रमाणे मोबदला सारसोळेच्या ग्रामस्थांना देण्यात यावा अशीही मागणी मनोज मेहेर यांनी सिडकोला दिलेल्या निवेदनात केली आहे.
सिडकोने नागरी सुविधा देण्याच्या नावाखाली साडे बारा टक्के भुखंडातून पावणे चार टक्के कापून घेतलेले आहेत. पण त्या पावणे चार टक्क्यातून नागरी सुविधांच्या भुखंडाची विक्री होत असेल अथवा दुसर्याच कामासाठी वापर होत असेल तर सिडकोने तसेच या कामासाठी पाठपुरावा करणार्या राजकीय घटकांनी सारसोळेच्या ग्रामस्थांना सर्वप्रथम विश्वासात घेणे आवश्यक आहे. उद्यान व क्रिडांगणाची जागा कमी करण्यास आमचा विरोध आहे. जागा कमी करणार असाल तसेच मार्केटच्या भुखंडाला अन्य कोणाला विक्री करणार असाल तर सर्वप्रथम त्या सर्व भुखंडाची आजच्या बाजारभावाप्रमाणे किमंत सर्वप्रथम सारसोळेच्या ग्रामस्थांना देण्यात यावी. सारसोळेच्या ग्रामस्थांना या जागेचा मोबदला न मिळाल्यास उद्यान व क्रिडांगण कमी करण्यास व मार्केटच्या जागेवर अन्य बांधकाम करण्यास सारसोळेच्या ग्रामस्थांचा विरोध राहणार. सारसोळेच्या ग्रामस्थांचे पावणे चार टक्के कापून मार्केट व उद्यान – क्रिडांगण बनविलेे आहे. सुरूवातीला शाळेसाठी जागा आरक्षित असली तरी हा भुखंड सारसोळेकरांच्या कापलेल्या पावणे चार टक्क्यातून बनविण्यात आला आहे. याबाबत सारसोळे ग्रामस्थांच्या भावना संतप्त असून ग्रामस्थांचा ×उद्रेकही झालेला आहे. मार्केटच्या भुखंडाची विक्री झाल्यास सर्वप्रथम आजच्या बाजारभावाप्रमाणे भुखंडाचे पैसे सर्वप्रथम सारसोळेच्या ग्रामस्थांना देण्याची मागणी मनोज मेहेर यांनी सिडकोला दिलेल्या निवेदनात केली आहे.