उध्दव ठाकरेंनी पवारांची माफी मागण्याची राष्ट्रवादीच्या रणरागिंनीची मागणी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेता पवारांवर टीका केली. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ यांच्या निवासस्थानी जोरदार आंदोलन केले. यावेळी आंदोलक महिलांनी उद्धव यांच्या निषेधाच्या घोषणा देत ‘मातोश्री’कडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मातोश्रीबाहेर काही काळ तणाव निर्माण झाला होता. उद्धव यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून राष्ट्रवादीच्या मुंबई महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा पेडणेकर आणि राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या अध्यक्षा आदिती नलावडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी आज दुपारी मातोश्री निवासस्थानाबाहेर धरणे देत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी ‘उद्धव ठाकरे हाय हाय’च्या घोषणाही दिल्या. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या होत्या. या आंदोलक महिलांनी मातोश्री निवास्थानाकडे जाण्याचा प्रयत्नही केला. मात्र मातोश्रीबाहेर तैनात असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना वेळीच रोखले. या आंदोलनानंतर मातोश्रीबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पवारांबद्दलचे अपशब्द मागे घेत त्यांची माफी मागावी, अशी मागणी या महिला आंदोलकांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा अदिती नलावडे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांचा मेंदू गुडघ्यात आहे. ज्यांना एकही निवडणूक लढवता येत नाही, अशांनी पवार साहेबांबाबत न बोललेले बरं. पवार साहेब हे केवळ राज्याचे नव्हे तर राष्ट्रीय नेते आहेत. देशाचे पंतप्रधान पण पवारसाहेब यांचे कर्तुत्व आणि नेतृत्व मान्य करतात. पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावाचा एक मोठा वटवृक्ष उभा केला आहे, तर उद्धव यांना साधी संघटना चालवता येत नाही. शिवसेना ही उद्धव ठाकरे यांना वारसा हक्कात मिळाली आहे, मात्र त्यांना तीही चालवता येत नाही असा टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना नलावडे म्हणाल्या. पक्षाचे सोडा उद्धव यांना सामना नावाचा पेपरही चालवता येत नाही. मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. त्यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मात्र त्याच महिलांचा अपमान सामनाच्या माध्यमातून केला गेला. पेपर मध्ये काय छापावे, काय नाही याची अक्कल नसलेल्यांनी साहेबांबाबत न बोलले बरे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना एक नी कॅप आणि प्रतिकात्मक वाघ भेट म्हणून दिला. उद्धव ठाकरे यांचा गुडघ्यातील मेंदू शाबूत रहावा यासाठी आम्ही उद्धव यांना नी कॅप भेट देत आहोत. उद्धव ठाकरे यांच्या लाचारपणामुळे शिवसेनेच्या वाघ आता मांजर झाला आहे. आम्ही शिवसेनेचे हितचिंतक आहोत त्यांचं मांजर पुन्हा वाघ व्हावं म्हणून प्रतिकात्मक वाघ भेट देत आहोत अशा अदिती नलावडे म्हणाल्या.
पवार साहेबांना डोकं नाही असे एकवचनी वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जाहीर निषेध करत आहे. स्वतः सत्तेत आहात, स्वतःला वाघ म्हणवता तुम्ही वाघ नाही तर मांजर आहात. आपण वाघ म्हणण्याच्या लायकीचे नाहीत. पवार साहेब हे संपूर्ण महाराष्ट्राचे नेते असून त्यांच्याबद्दल असे बोलणे अत्यंत चुकीचे आहे. घडलेल्या घटनेची उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर यांनी केली.
या आंदोलनात बिलकीश आपा, जिल्हाध्यक्ष उत्तर मुंबई डॉ. सुरेना मल्होत्रा, डॉ. रिना मोकल, अनिता थोरात, स्वाती माने, युवक तालुकाध्यक्ष राकेश धिलोड आणि पक्षा इतर पदाधिकारी उपस्थित होते.