मुंबई : महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या समृध्दी महामार्गावरील कमाल वेग मर्यादा ताशी १२० किलोमीटर ठरवण्यात आली आहे. यादृष्टीनेच प्रकल्पाच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, भारतात बनवण्यात येणाऱ्या गाड्यांचे डिझाइन पाहून वेगमर्यादा निश्चित करण्याची सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. सह्याद्री अतिथी गृहावर रस्ते सुरक्षा परिषदेची बैठक झाली. चर्चेदरम्यान नियोजित समृद्धी महामार्गावरील वेग मर्यादेबाबत त्यांनी ही सूचना केली.
नागपूर ते मुंबई दरम्यान प्रस्तावित समृद्धी महामार्गावर करावयाच्या रस्ते सुरक्षाविषयक उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. समृद्धी महामार्गासाठी अधिक वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्या वेगमर्यादेइतकी अत्याधुनिक वाहने आपल्याकडे आहेत का, याचा विचार करण्यात यावा, असे रावते यांनी सुचविले. समृद्धी महामार्ग ७०० किलोमीटरचा असून मुंबई ते नागपूर हे अंतर आठ तासात पूर्ण करावयाचे उद्दिष्ट ठेवून प्रकल्पाची आखणी करण्यात येत आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या मार्गाचा आढावा घेऊन वेग मर्यादेत आवश्यक असल्यास बदल केला जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने ईनाडूशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ जुलै २०१५ला समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती. हा प्रकल्प जानेवारी २०१८ मध्ये सुरु होणे अपेक्षित होते. मात्र जमीन संपादन आणि स्थानिक गावांचा विरोध असल्याने या प्रकल्पाला उशीर झाला आहे. प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपालवर यांची नियुक्ती केली आहे. येत्या दोन महिन्यात या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रकल्पासाठी ४६,००० कोटी रुपयांचा एकूण खर्च प्रस्तावित आहे. समृद्धी महामार्ग १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे १६ तासांचे अंतर केवळ आठ तासात पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.