सुजित शिंदे
नवी मुंबई : भारत सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेल्या राहण्यायोग्य शहरांच्या क्रमवारीत आपल्या नवी मुंबई शहराचा देशात दुसरा क्रमांक असून या सन्मानामध्ये नागरिकांचे योगदान मोठे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फतही आवश्यक अशा सर्वांगीण सुविधा पुरविण्यामध्ये सर्वव्यापी भूमिका घेतली जात असून अनेक कारणांमुळे वापरात येण्यात बरीच वर्ष अडचणी उद्भवलेल्या शिरवणे येथील मार्केटच्या उद्घाटनाचा योग आपल्याच महापौरपदाच्या कारकिर्दीत आल्याचे समाधान व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी स्वत: व्यवसाय करणा-यांना योग्य न्याय मिळेल अशी भूमिका व्यक्त केली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिरवणे येथील दैनंदिन बाजार (मार्केट) संकुल इमारतीच्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, निमंत्रक तथा ब प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. कविता आगोंडे, फ प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. अनिता मानवतकर, आरोग्य समिती सभापती श्रीम. उषा भोईर, नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समिती सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, परिवहन सदस्य श्री.प्रदीप गवस, अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र पाटील, शहर अभियंता श्री. मोहन डगांवकर, उपआयुक्त श्री.दादासाहेब चाबुकस्वार, कार्यकारी अभियंता श्री. सुभाष सोनावणे, नेरूळ विभागाचे सहा. आयुक्त श्री. संजय तायडे आणि इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मार्केटमुळे फेरीवाल्या व्यावसायिकांची सुविधा होणार आहे, शिवाय नागरिकांनाही एकाच ठिकाणी भाजीपाला, फळे, मासळी उपलब्ध होणार असून त्यासोबतच येथील ग्रामस्थ तसेच नागरिक यांच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमांकरिता एक चांगले सभागृह उपलब्ध होत असल्याचा आनंद स्थानिक नगरसेवक म्हणून वाटतो असे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी सांगितले. शहर स्वच्छतेत मानांकन मिळविण्यात आपण सर्वजणांनी एकजुटीने प्रयत्न केले तसेच योगदान प्रत्येकाने प्लास्टिक व थर्माकोलमुक्त नवी मुंबई करण्यात द्यावे असे आवाहन करीत महापौरांनी तशा प्रकारची सामुहिक प्रतिज्ञा नागरिकांसमवेत घेतली.
बेलापूर विधानसभा सद्स्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी शिरवणेमध्ये मार्केटची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत सर्वच विभागांमध्ये अशा प्रकारे जागा उपलब्धता लक्षात घेऊन मार्केटची व्यवस्था करावी असे सूचित केले.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी याप्रसंगी बोलताना महानगरपालिकेमार्फत चांगल्या सोयी-सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिला जात असून नागरिकांनी त्यांचा योग्य प्रकारे करावा असे सांगितले. जोपर्यंत प्रत्येकजण मनापासून ठरवत नाहीत तोपर्यंत कोणतेही काम यशस्वी होणार नाही असे स्पष्ट करीत नागरिकांनी प्लास्टिक व थर्माकोलचा स्वत:हून निश्चय करून वापर थांबवावा असे आवाहन आयुक्तांनी केले. याठिकाणी फेरीवाल्यांच्या व नागरिकांच्या सुविधेसाठी तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारण्यात येत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
सभागृनेते श्री. रविंद्र इथापे यांनी शिरवणे व परिसरातील नागरिकांना एक चांगली मार्केट इमारत व त्यासोबत विविध कार्यक्रमांकरिता सभागृह उपलब्ध होत असल्याचे सांगत बरीच वर्षे विविध अडचणींमुळे रेंगाळलेले हे काम नगरसेवक म्हणून पाठपुरावा केलेल्या श्री. जयवंत सुतार यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत पूर्णत्वास येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
शिरवणे, सेक्टर 1 येथील भूखंड क्र. 761 ते 764 यावर 750 चौ.मी. क्षेत्रफळाची ही मार्केट इमारत उभारण्यात आली असून त्यामध्ये तळमजल्यावर 32 ओटले व 14 गाळे आहेत. त्याचप्रमाणे वरील मजल्यांवर सभागृहाची सुविधा आहे.