मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसानं विश्रांती घेतली आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी सात धरणं 90 टक्के भरली आहेत. याशिवाय जवळपास निम्म्या मुंबईची तहान भागवणारं भातसा धरणं 84 टक्के भरलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
मुंबईत आज आणि उद्या संततधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आहे. आज सकाळपासून मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे. या आठवड्याच्या शेवटी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी वाढू शकते. यामुळे येत्या वर्षात मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही.
मुंबईला दिवसाकाठी 4 हजार 200 मिलियन लिटर इतकं पाणी लागतं. मुंबई महापालिका सात तलावांमधून (मोडक सागर, तुळशी, विहार, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा) मुंबईकरांना पाणी पुरवठा करते. सध्या या सात तलावांमध्ये मिळून 12.94 लाख मिलियन लिटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या तलावांमध्ये एकूण 13.05 लाख मिलियन लिटर इतका पाणीसाठा होता. पुढील वर्षभर मुंबईला कोणत्याही कपातीविना पाणी पुरवठा करायचा झाल्यास 1 ऑक्टोबरपर्यंत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 14.47 लाख मिलियन लिटर इतका पाणीसाठा असणं गरजेचं आहे.