सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : प्रवासादरम्यान प्रवासी रिक्षात आपली पिशवी विसरून गेला. रिक्षाचालकाने त्याचा शोध घेत ती पिशवी, रोख रक्कम आणि कागदपत्रे त्या महिला प्रवाशाच्या नातेवाईकांकडे स्वाधीन केली. रिक्षाचालकाच्या या प्रामाणिकपणाबद्दल शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर आणि शिवसेनेच्या नगरसेवक तसेच पदाधिकार्यांनी त्याला शाबासकी देत प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
नेरूळमधील रिक्षाचालक प्रकाश शंकर शेवाळे (रिक्षा क्रमांक एम ४३- एसी३५७७) कोपरखैराणेवरून एका महिला प्रवाशाला घणसोलीला सोडले. या महिलेची प्लास्टिकची पिशवी रिक्षामध्येच विसरल्याचे रिक्षाचालक शेवाळे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेचच शिवसेना उपजिल्हाप्रमुख व महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे उपाध्यक्ष दिलीप भाऊ घोडेकर यांच्याकडे आणून दिली.
त्या पिशवीमध्ये एक पाकिट, १७०० रूपये रोख रक्कम, एक मोबाईल व अन्य महत्वाचे कागद होते. घोडेकर यांनी मोबाईलवरून महिला प्रवाशाचा शोध घेतला असता, त्या महिला संगीता साळेकर, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रहीवाशी असल्याचे समजले. घणसोली येथील भाऊ मंगेश तुपे यांच्याकडे काही कामानिमित्त आल्याचे घोडेकर यांना समजले. घोडेकर यांनी तात्काळ मंगेश तुपे यांच्याशी संपर्क करून ते साहित्य त्यांना परत दिले. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाची दखल घेत दिलीप भाऊ घोडेकर यांनी प्रकाश शेवाळेंचा सत्कार केला. यावेळी दिलीप घोडेकर यांच्यासमवेत नगरसेवक रंगनाथ औटी यांच्यासह अन्य नेरूळमधील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.