मुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात माहिती देताना विखे पाटील यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले असून, त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेतील काँग्रेसचे सर्व आमदार आपले एका महिन्याचे वेतन पक्षाकडे जमा करणार आहेत. केरळवर आलेली नैसर्गिक आपत्ती भीषण असून, आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या समवेत शनिवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीनंतर विखे पाटील यांनी ही माहिती दिली.