सुजित शिंदे
नवी मुंबई : सारसोळे गावाच्या समोरील बाजूस व कुकशेत गावाच्या सुरूवातीलाच झुलेलाल मंदिरालगत कुकशेतच्या ग्रामस्थांकरिता सुरू असलेले महिला मार्केटचे काम गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेले आहे. सभोवतालच्या परिसरात फेरीवाल्यांची वाढती संख्या व आलेला बकालपणा पाहता या मार्केटचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापौर (१८ ऑगस्ट)व आयुक्तांकडे (१६ ऑगस्ट) केली आहे.
महापालिका प्रभाग ८५ मध्ये नेरूळ सेक्टर ६चा काही परिसर, सारसोळे गावातील काही परिसर आणि कुकशेत गावाचा समावेश होत आहे. कुकशेत हे पूर्णपणे शंभर टक्के पुनर्वसित गाव आहे. झुलेलाल मंदिरासमोरील तसेच सारसोळे गावालगत, ज्या ठिकाणी कुकशेत गाव सुरू होते, त्यासाठी महिलांसाठी बहूउद्देशीय मार्केटसाठी भुखंड राखीव आहे. या मार्केटचे काम गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेले आहे. काम सुरू झाल्यावर पाया भरून काम जे थांबले, ते आजतागायत थांबलेले आहे. सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाचा परिसर आज पूर्णपणे फेरीवाल्यांच्या विळख्यात आहे. फेरविक्रेत्यांच्या हातगाड्याही वाढल्या असून वाहतुक कोंडीला व बकालपणाला खतपाणी घालत आहे. फेरीवाल्यांच्या विरोधात सातत्याने महापालिका प्रशासनाकडे तक्रारींचा रतीब घालूनही फेरीवाल्यांना पालिकेचा अतिक्रमण विभाग आश्रय देत असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून महापौर व आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
कुकशेत गावाच्या सुरूवातीला महिला मार्केटचे काम जे रखडले आहे. ते पालिका प्रशासनाने लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करावे. हे मार्केट पूर्ण झाल्यास महिलांना, महिला बचत गटांना, महिलांच्या सामाजिक संस्थांना रोजगार प्राप्त होवून महिला सक्षमीकरणास हातभारही लागेल. गेल्या काही महिन्यापासून या रखडलेल्या मार्केटच्या बांधकामामुळे परिसराला बकालपणाही प्राप्त झाला असून सध्या पावसाळ्याच्या दिवसात कुकशेत ग्रामस्थांना यामुळे साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका प्रशासनाच्या बॅकेतील वाढणार्या एफडी या भूषणावह बाब नसून कुकशेत ग्रामस्थांच्या सुविधांसाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर रखडलेली बांधकामे महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. कुकशेतचे ग्रामस्थ हे स्थंलातरीत व पुनर्वसित असल्यामुळे त्यांना लवकरात लवकर सर्व सुविधामय जीवन उपलब्ध करून देणे हे पालिका प्रशासनाचे प्रथम कर्तव्य असताना पालिका प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे. कुकशेत गावातील भुखंडावर सुरू असलेली व रखडलेली विकासकामे पालिका प्रशासनाचे कुकशेत गावाकडे व ग्रामस्थांकडे लक्ष नसल्याचे स्पष्टपणे दाखवून देत आहे. महिला मार्केटच्या रखडलेल्या कामाची आपण पाहणी करून ते काम लवकरात लवकर सुरू करण्यास आपण संबंधितांना निर्देश देणयाची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापौर व आयुक्तांकडे केली आहे.