अमोल इंगळे
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका १९ वर्षीय तरुणीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नवी मुंबई महानगरपालिकेत सध्या स्थायी समिती सदस्य आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी सिडको संचालकपदही सांभाळले होते. याप्रकरणी अलिबाग न्यायालयात सुनावणी झाली असता त्यांना जामिन मंजुर् झाला आहे.
पोलिसांनी मंगळवारी सकाळी भगत यांच्या दिघोडे येथील फार्म हाऊसवर जाऊन तपासणी केली. मात्र, ते तिथेही सापडले नाहीत. त्यांचा फोनही बंद आहे. पोलिसांचे एक पथक त्यांना शोधण्यासाठी रवाना झाले होते. त्यांचा पोलिसांकडून सर्वत्र शोधही घेतला जात होता.
ही घटना आठवड्यापूर्वीची आहे. पीडित तरुणी आपल्या वडिलांच्या कामासाठी भगत यांना भेटली होती. त्यातून तिची भगत यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर आर्थिक मदत मागण्यासाठी ही तरुणी भगत यांच्याकडे गेली होती. तेव्हा त्यांनी तिला दिघोडे येथील फार्म हाऊसवर नेऊन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, असे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.उरण पोलिसांनी नामदेव भगत यांच्याविरोधात कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे, पोलिस पुढील तपास करत आहेत.
या घटनेनंतर नेरूळ गावात तणावाचे वातावरण असून गावामध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. नामदेव भगत यांनी कॉंग्रेस पक्षामध्ये अनेक वर्ष कार्यरत होते. तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस अशी संघटनात्मक वाटचाल करताना त्यांनी सिडको संचालकपदी भूषविले होते. २०१५ साली झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केला होता. नामदेव भगत यांच्याबाबत नवी मुंबईतील सोशल मिडियावर जोरदार चर्चा रंगत असून अनेक राजकीय घटकही दिवसभरात पडद्यामागच्या हालचालीत व्यस्त असल्याचे पहावयास मिळाले.