अमोल इंगळे
नवी मुंबई : पावसाळ्यात अनधिकृत बांधकाम न पाडण्याचे संकेत असतानाच सिडकोने नेरूळ सेक्टर सहामधील भाजी मार्केटच्या मैदानावर असलेल्या हनुमान मंदिरावर हातोडा चालवित मंदिर पाडून टाकले आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये वरूणा आणि हिमालय या सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटीच्या मध्यभागी असलेल्या भाजी मार्केटच्या मैदानावर स्थानिक रहीवाशांनी अनेक वर्षापूर्वी छोटेखानी हनुमान मंदिर बांधले होते. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक हनुमान मंदिरात दर्शनासाठी येत असत. हे मंदिर सिडकोच्या जागेवर असल्यामुळे या मंदिराला अनधिकृत ठरवित सिडकोने यापूर्वीच नोटीसही पाठविली होती. तथापि या मंदिरामुळे कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीला अथवा बांधकामांना अडथळा ठरत नसल्याने मंदिर वाचविण्यासाठी शिवसेनेचे उपविभागप्रमुख प्रल्हाद पाटील हे प्रशासनदरबारी गेल्या काही महिन्यापासून सतत धावपळ करत होते.
मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक मंदिर परिसरात पोलिसांच्या गाड्या व मोठ्या प्रमाणावर फौजफाटा दाखल झाल्याने मंदिर तोडणार असल्याची कल्पना स्थानिक रहीवाशांना आली. मंदिर वाचविण्यासाठी महापालिकेचे ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर, शिवसेना उपविभागप्रमुख प्रल्हाद पाटील, शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले व मनोज तांडेल, उपशाखाप्रमुख इमरान नाईक यांच्यासह स्थानिक रहीवाशी पुढे आले. प्रल्हाद पाटील यांनी मंदिर वाचविण्यासाठी आपण करत असलेला पत्रव्यवहारही सिडकोच्या अधिकाऱ्यांना सादर केला. मंदिराचा कोणालाही अडथळा नसल्याने मंदिर न पाडण्याविषयी मनोज मेहेर, दिलीप आमले, मनोज तांडेल हे सिडको अधिकाऱ्यांकडे मागणी करत होते. श्रावन महिना सुरू असल्याने किमान या महिन्यात तरी मंदिर न पाडण्याची गयावया स्थानिक रहीवाशांकडून सिडको अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तथापि मुबलक प्रमाणात पोलिस बंदोबस्त असल्याने सिडकोने स्थानिक रहीवाशांना न जुमानता मंदिर पाडून टाकले. यावेळी मंदिर परिसरात अतिक्रमण करून व्यवसाय मांडलेल्या फेरीवाल्यांचेही अतिक्रमणही सिडकोने कारवाईत उध्दवस्त केले.
मंदिर वाचविण्यासाठी प्रल्हाद पाटील, दिलीप आमले सातत्याने खासदार राजन विवारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्यासह अन्य सर्वत्र फोन करून प्रयत्न करत होते. शिवसेनेचे पदाधिकारी मंदिर वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतानाच मैदानासमोरील एका कार्यालयात बसून एका पक्षाचे तीन स्थानिक पदाधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आधी मार्केट गेले , आता मंदिर गेले, काही दिवसांनी महापालिकेचे उद्यान व क्रिडांगणातही कपात होणार असे सांगत परिसराचा चांगला विकास सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.