नवी मुंबई : केरळ राज्यातील पूरग्रस्तांना नवी मुंबई महापालिकेकडूनही मदत व्हावी, याकरिता बेलापूरच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी केरळ पूरग्रस्तांना ५० लाखांची मदत करण्याच्या मागणीचे निवेदन नुकतेच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांना दिले.
यावेळी आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, केरळ राज्यामध्ये पुराने थैमान घालून आपत्त्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथील अनेक घरे उध्वस्त झाली असून पूरग्रस्तांना अनेक राज्यातून, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत विविध माध्यमातून सहाय्य केले जात आहे. केरळ राज्य हा भारताचा अविभाज्य घटक असून त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. अशी आपत्तीजनक परिस्थिती कोणावरही येऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये कोणाच्याही मागे उभे राहण्याची महाराष्ट्र राज्याची संस्कृती आहे. अनेक संस्था, संघटना पूरग्रस्तांना मदत करीत आहेत. मी सुद्धा माझ्या एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी दिले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचीही ही नैतिक जबाबदारी असून नवी मुंबई पालिकेमार्फतही ५० लाखांची मदत केरळ राज्यातील पूरग्रस्तांना देण्यात यावी, अशी मागणी मी महापालिका आयुक्त यांना केली असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.