नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत व विनापरवानगी बांधकामांवर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे मार्गदर्शनानुसार धडक कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने बेलापूर विभागांतर्गत भूखंड क्र. सी 12 सेक्टर 23 दारावे येथील ड्रीम हाऊस सोसायटीच्या पार्किंग एरीयामध्ये अनधिकृत मदरसा सुरु होते. या मदरसेच्या अनधिकृत बांधकामास बेलापूर विभाग कार्यालयामार्फत एम.आर.टी.पी. कायदा 1966 मधील कलम 53(1) अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. तरीही त्यांनी हे अनधिकृत बांधकाम काढून घेतले नसल्याने बेलापूर विभागामार्फत जोरदार कारवाई करत बांधकाम निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या मोहिमेत 1 ट्रक, 20 मजुरांसह बेलापूर विभागातील अधिकारी, कर्मचारी तैनात होते.
त्याचप्रमाणे तुर्भे विभागातील सेक्टर 18 मॅफको मार्केट येथील हिमाचल कोल्ड स्टोरेज यांनी अनधिकृत दोन प्लास्टिक शेड उभारलेले होते. यावर तुर्भे विभाग कार्यालयामार्फत निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 2 जे.सी.बी., 1 ट्रक, 25 मजुरांसह तुर्भे विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक, कर्मचारी या मोहीमेमध्ये कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात होते. यापुढील काळातही सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात या मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.