नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेची संपूर्ण माहिती देणारे माध्यम म्हणजे त्यांचे सर्व्हिस बुक होय. जुन्या पोथीसारखे दिसणारे हे ‘सर्व्हिस बुक’ आता अस्तित्वहीन होणार आहे. कारण शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांची सर्व सेवापुस्तिका आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका आॅनलाईन झाल्यानंतर आता शालार्थ अर्थात शिक्षकांची सेवापुस्तिका आॅनलाईन करण्याची प्रक्रिया जि.प.मध्ये सुरू झाली आहे.
कर्मचारी नोकरीत लागल्यापासून तो निवृत्त होईपर्यंत प्रमोशन, ग्रेड पे, त्याच्यावर झालेल्या कारवाई इत्थंभूत माहिती सेवापुस्तिकेत नोंदविली जाते. त्यामुळे शासकीय विभागामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेचे गठ्ठे पडलेले असतात. कधी कधी त्या गहाळ सुद्धा होतात. यावर उपाय म्हणून सरकारने आता हे ‘सर्व्हिस बुक’ आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व्हिस बुकमधील सगळी माहिती आता आॅनलाईन सेव्ह राहणार असून सरकारी कर्मचाºयांना सुटीचा अर्जसुद्धा आॅनलाईन टाकावा लागणार आहे. केंद्र व राज्य सरकारने ई-गव्हर्नन्सवर भर देण्यासाठी अनेक प्रणाली आॅनलाईन केल्या आहेत. यात निविदा प्रक्रियेपासून सेवार्थ प्रणालीपर्यंत सगळ्या प्रणाली आॅनलाईन केल्या जात आहे. आता ‘सर्व्हिस बुक’ सुद्धा आॅनलाईन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागपूर जिल्हा परिषदेतून या योजनेचा शुभारंभ होत आहे.
पारदर्शकता वाढणार
कर्मचाऱ्याच्या नियुक्तीचा आणि सेवानिवृत्तीची दिनांक, कोणत्या वर्गात नियुक्ती झाली, पगारवाढीची माहिती, कर्मचाऱ्याविरुद्ध झालेल्या चौकशी कारवाईंची माहिती, त्याने घेतलेल्या सुट्यांची माहिती सर्व्हिस बुकमध्ये नोंदविली जाते. हे सर्व्हिस बुक अनेकदा जुने आणि जीर्ण होते. परंतु आता हे आॅनलाईन केल्यास ही समस्या सुटणार आहे. तसेच सर्व्हिस बुक आॅनलाईन असल्याने त्यात खोडतोड करून बॅकडेट एन्ट्री करणे शक्य होणार नसून कामाची पारदर्शकता वाढणार आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली कार्यशाळा
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या ई-सर्विस बुकचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. आता शिक्षकांच्या सर्विस बुकचे काम सुरू करण्याचा निर्णय जि.प. प्रशासनाने घेतला आहे. मानव संपदा कार्यक्रमांतर्गत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील १३ ब्लॉकचे गटशिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची कार्यशाळा पार पडली. २८ आॅगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत शिक्षकांकडून फॉर्म भरून घेण्यात येणार आहे. त्यानंतर आॅनलाईन डाटा एन्ट्रीचे काम सुरू होणार आहे.