मी ज्यावेळी राज्याची ब्ल्यू प्रिंट असावी असं सांगायचो, त्यावेळी प्रत्येक वेळी मला खोचकपणे विचारलं जायचं ब्ल्यू प्रिंट कुठे, ब्ल्यू प्रिंट कुठे?… आणि मी ब्ल्यू प्रिंट सादर केल्यानंतर मात्र ती वाचायचेदेखील कष्ट कुणी घेतले नाहीत अशी खंत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण देशात कुठल्याही राज्यानं ब्ल्यू प्रिंट आखल्याचं उदाहरण नाही, फक्त मनसेनं अशी ब्ल्यू प्रिंट सादर केल्याचं व त्यात आपल्याला अपेक्षित असलेला सगळा कार्यक्रम असल्याचं ठाकरे म्हणाले.
बीडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. त्यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा आधी थोडा अभ्यास करून या असेही त्यांनी सुनावले. मला त्यावेळी पत्रकारांच्या बोलण्यातली खोच समजत होती. मात्र दुर्दैव हे की कोणीही ती ब्ल्यू प्रिंट आणल्यावर वाचण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. आजही ती मनसेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असेही त्यांनी सांगितले.
सरकारने ब्ल्यू प्रिंटमधल्या काही गोष्टींवर काम सुरू केले आहे. मात्र ते अजून पूर्णत्त्वास आलेले नाही. नाशिकमध्ये महापालिकेत सत्ता असताना मी या विकास आराखड्यानुसारच विकासकामे केली. जी कामे मी केली ती लोकांसमोर आहेत असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य तरूणांचा कल शहराकडे आहे याबाबत प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हटले, शेतीबाबत देशात आणि राज्यात इतकी नकारात्मकता आहे की तरूणांना शेती करावीशी वाटत नाही.
वाढत्या शेतकरी आत्महत्या, हमीभाव न मिळणे, बी बियाणांचे वाढलेले दर, देशात आणि राज्यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या या पाहून ग्रामीण भागातील तरूणालाही हेच वाटते की शेतीकडे वळू नये, त्यापेक्षा नोकरी करावी. माझे आंदोलन परप्रांतियांच्या विरोधात आहे कारण भूमीपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही माझी भूमिका आधीही होती आणि यापुढेही राहणार आहे असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच फक्त शेतीबाबत बोलले म्हणजेच मी ग्रामीण भागाचा विचार करतो असे समजू नका असाही टोला राज ठाकरेंनी लगावला.