सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून विविध जनकल्याणकारी योजना जाहिर केल्या जातात. पण नगरसेवक जागरूकपणे प्रभागासाठी त्या योजना राबविण्यासाठी परिश्रम घेत असेल तर त्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यत जातात व त्या योजनांना मूर्त स्वरूप येते. प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिकेची महिलांकरिता शिवण प्रशिक्षण योजना राबविण्यात पुढाकार घेतल्यामुळे आज परिसरातील तब्बल ४० महिला स्वंयरोजगारासाठी सुसज्ज झाल्या असून अन्य महिलांची दुसरी बॅच लवकरच सुरू होणार असल्याची माहिती नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांनी दिली.
महापालिका प्रशासनाकडून महिलांकरिता विविध योजना राबविल्या जात आहेत. शिष्यवृत्ती असो वा मुलींच्या सायकलीचा विषय असो अथवा महिलांचा शिवण प्रशिक्षण उपक्रम असो. नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांनी प्रत्येक उपक्रमात सक्रिय योगदान देत हे उपक्रम परिसरात राबविले आहेत. महापालिकेच्या शिवण योजनेकरिता महिलांनी सहभागी व्हावे यासाठी नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांनी परिसरातील अधिकाधिक महिलांशी संपर्क साधत त्यांना या योजनेचे महत्व पटवून देताना सहभागी होण्याचे आवाहन केले.
नेरूळ सेक्टर सहामध्ये दर्शन दरबारमध्ये महिलांकरिता शिवण प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. सुरूवातीला ५० महिला यात सहभागी झाल्या, शेवटपर्यत ४० महिलांनी सहभागी होत शिक्षण पूर्ण केले. कौंटूबिक कारणास्तव १० महिलांना अभ्यासक्रम पूर्ण करता आले नाही. या महिलांना केवळ प्रशिक्षण देवून आम्ही शांत बसणार नाही, तर या महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहण्यापर्यत आम्ही त्यांना साथ देणार असल्याची माहिती नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांनी दिली.