मुंबई : कुलाब्यात पाच विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आठवी इयत्तेत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी काल दुपारपासून बेपत्ता झाल्या आहेत. पालक चिंतेत असून याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुलाबा पोलिसांकडून बेपत्ता मुलींचा शोध सुरु आहे. कुलाबा पोलीस ठाण्याबाहेर धास्तावलेल्या पालकांनी गर्दी केली आहे. कुलाबा पोलिसांची विविध पथके विद्यार्थिनींचा शोध घेण्याकरिता इतरत्र रवाना झाली आहेत अशी माहिती झोन १ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.
फोर्ट कॉन्व्हेट स्कूल कुलाबा येथे या ५ ही विद्यार्थिनी शिकतात. शुक्रवारी या विद्यार्थिनींचा ओपन डे म्हणजे परीक्षेचा निकाल होता. या विद्यार्थिनींना परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्या नाराज होत्या. दुपारी २. ३० वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर या मुली घरी न जात मरीन ड्राईव्ह येथे बसल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्याचे समोर आले. मुली घरी न आल्यामुळे धास्तावलेल्या पालकांनी आधी शाळेत धाव घेत विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. नंतर पोलिसात तक्रार दाखल केली. कुलाबा पोलिसांची वेगवेगळी पथके या विद्यार्थिनींचा शोध घेत आहे. काल दुपारपासून कुलाबा पोलीस ठाण्याबाहेर पालकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.