नवी मुंबई : पदवी आणि नोकरीसाठी शिक्षण घेण्याबरोबरच शिक्षणाने जीवनाला दिशा मिळायला हवी, असे मत लोकनेतेे गणेश नाईक यांनी मांडले आहे.
श्रमिक शिक्षण मडळाच्या वतीने शिक्षकदिनी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांचा सत्कार समारंभ कोपरखैरणे येथील रा फ नाईक विद्यालयात श्रमिक शिक्षण मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी शिक्षणाचा उददेश तसेच देशातील सद्यस्थितीबाबत आपले विचार मांडले.
कष्टकरी आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळवून देण्यासाठीच श्रमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली. ८४ विद्यार्थ्यांवरुन आज या शिक्षण संस्थेची विद्यार्थीसंख्या साडेसहा हजारांवर गेल्याबददल लोकनेते नाईक यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीमध्ये आजी-माजी तसेच दिवंगत विश्वस्तांचा मोलाचा वाटा असून विद्यमान सचिव सुरेशदादा नाईक यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
जीवनाधारित शिक्षणाचे महत्व विशद करतानाच लोकनेते नाईक यांनी विद्यार्थ्यांचा कल बघून त्यांचे करियर घडविण्याचा सल्ला दिला. देशात सद्या निराशेचे वातावरण असून जीवनावश्यक वस्तू, इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. नोटाबंदीमुळे उद्योग, व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे फसवेगीरी करणार्यांपासून सावध करण्याचे कामही शिक्षकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या सत्कार सोहळयास हर्डीलिया कंपनीचे माजी महाव्यवस्थापक पी पी रॉय, विठठल पुजारी, संस्थेचे सचिव सुरेशदादा नाईक, नगरसेवक लिलाधर नाईक, नगरसेविका लताताई मढवी, संस्थेचे विश्वस्त सदानंद म्हात्रे, मुख्याध्यापक सुधीर थळे, मुख्याध्यापिका योजना तिगडे, प्राचार्य प्रताप महाडीक, समन्वयक नरेंद्र म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.