कामिनी पेडणेकर – मुंबई
दहीहंडीच्या दिवशी जमलेल्या युवकांसमोर बोलताना भाजपा आमदार राम कदम यांची जीभ घसरली आणि याचाच फायदा घेत केंद्रात व राज्यातील भाजपासोबत सत्तेत असणार्या शिवसेनेने राम कदमांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडली नाही. विविध चॅनलवर शिवसेना नेत्यांनी राम कदमांवर गरळ ओकली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तर सामनाच्या संपादकीयमध्येही राम कदमांवर आसूड ओढले. मग नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकाने कोणते पुण्याचे काम केले आहे. त्यावर भाष्य करण्यास उध्दव ठाकरे कोणत्या मूहूर्ताची प्रतिक्षा करत आहेत, असा संतप्त सवाल आता भाजपच्या नेतेमंडळींकडून, पदाधिकार्यांकडून व कार्यकर्त्यांकडून उघडपणे विचारला जात आहे.
राम कदमांच्या वक्तव्याचा फायदा उचलत कॉंग्रेस, मनसे, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत शिवसेनेनेही आघाडी उघडली होती. शिवसेना नेतेच नाहीतर कदमांवर टीकास्त्र सोडण्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनीच आघाडी उघडली होती. राम कदमप्रकरणी भाजपला नैतिकतेचे डोस पाजण्यास आघाडीवर घेणार्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मौनी भूमिका घेत कोणती नैतिकता शिवसैनिकांना शिकवित आहेत, असा प्रश्न आता भाजप कार्यकर्त्यांकडून विचारला जावू लागला आहे.
नामदेव भगतप्रकरणाने शिवसेना चांगलीच अडचणीत सापडली आहे. त्यातच जामीन रद्द झाल्यावर पोलिसांकडे न जाता नामदेव भगत फरार झाल्याने शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेना नगरसेवक, सिडकोचे माजी संचालक आणि शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्कप्रमुख नामदेव भगत यांनी नेरुळ गावात राहणार्या एका १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन ३५४ कलमान्वये उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर त्यांच्या अंतरिम जामीन अर्जावर ६ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांना दिलेला अंतरिम जामीन रद्द करत जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान, नामदेव भगत यांना कोणत्याची क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने पोलीस शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांच्या शोधात आहे.
भाजपची राम कदमप्रकरणामुळे कोंडी करणार्या शिवसेनेला नामदेव प्रकरणामुळे तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. राम कदमामुळे भाजपवर टीकेची तोफ डागणार्या शिवसेनेची नामदेव भगतप्रकरणी काय भूमिका आहे, हे उध्दव ठाकरे इतक्या दिवसानंतरही का जाहिर करत नाही, त्यांना कोणती अडचण आहे, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
शनिवारी, ८ ऑगस्ट रोजी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा वाशीत आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेची नेतेमंडळी नवी मुंबईत येणार असल्याने त्यांना पत्रकारांच्या भगतप्रकरणी विचारल्या जाणार्या प्रश्नांचा ‘सामना’ करावा लागणार आहे. नामदेव भगत हे शिवसेना नगरसेवक, माजी सिडको संचालक आणि शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्कप्रमुख असलेले मातब्बर प्रस्थ आहे. शिवसेना खासदार राजन विचारे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी नामदेव भगत यांची विशेष जवळीकही आहे. ठाण्याचे पालकमंत्री व खासदार यांनीही नामदेव भगतप्रकरणी भूमिका जाहिर न केल्याचीही नाराजी भाजपकडून व्यक्त केली जात आहे. राम कदममुळे आक्रमक भूमिका घेणार्या शिवसेनेला नवी मुंबईतील नामदेव भगतप्रकरणामुळे घरचा आहेर मिळाला असून आता भाजपच्या तोफखान्याचा शिवसेनेला ‘सामना’ करावा लागणार आहे. भाजपला नैतिकतेचे धडे देण्यापूर्वी शिवसेनेने प्रथम आपल्या नगरसेवकांना नैतिकता शिकवावी, अशी भाषा आता भाजप कार्यकर्त्यांकडून वापरली जावू लागली आहे.
——————— 000000000000000000000
आज सकाळी शिवसेनेचे मुखपत्र असलेले ‘सामना’ वर्तमानपत्र वाचले. संपादकीयही वाचले. तसेच नवी मुंबईतील शिवसेनेतील घडामोडीविषयीही आलेल्या बातम्याही वाचल्या. कोणत्याही गोष्टीचा न्यायालयीन निर्णय लागत नाही. तोपर्यत त्या गोष्टीचे राजकारण करू नये. अग्रलेखही लिहीण्याची घाई करू नये. मध्यंतरी शिवसेनेच्या एका उच्चशिक्षित व प्रशासकीय सेवेतील ज्ञानात मातब्बर असणार्या नेत्याने महिलांविषयी ‘उघड्या-नागड्याची’ भाषा वापरली होती. त्याबाबतही शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही व कोणतीही कारवाई केलेली नाही. नवी मुंबईकर जनता फार मोठ्या अपेक्षेने शिवसेनेकडे पाहत आहे.एका वक्तव्यावर मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसची महिला आघाडी निदर्शने व आंदोलन करते. नवी मुंबईत तर राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत आहे. मग शिवसेनेतील या घडामोडीबाबत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी, नगरसेविका, तसेच राष्ट्रवादीची नेतेमंडळी काय भूमिका घेतात, याकडेही नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहीले आहे.
– विजय घाटे
नवी मुंबई भाजप जिल्हा सरचिटणिस