सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनामध्ये जवळपास ८५० कामगार ठोक पगारावर काम करत असून या कामगारांना महापालिका प्रशासनाने अद्यापि वेतनश्रेणी लागू केलेली नाही. ठोक मानधनावरील कामगारांना वेतनश्रेणी लागू करण्याविषयी शासनाने २१ डिसेंबर २००९ रोजी अध्यादेश काढलेला असतानाही नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कामगारांच्या समस्यांवर काम करणार्या ‘नवी मुंबई महानगरपालिका मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी महासंघ’ या कामगार संघटनेने पालिका प्रशासनाने ठोक पगारावर काम करणार्या कामगारांना वेतनश्रेणी लागू करण्याविषयी २० ऑक्टोबर २०१४ पासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. परंतु प्रशासन जाणिवपूर्वक ठोक पगारावर काम करणार्या पालिका कामगारांना वेतनश्रेणी देण्यास टाळाटाळ करत असल्याने आता या कामगारांच्या वेतनश्रेणीसाठी अखेरचा उपाय म्हणून आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत आवळे यांनी दिला आहे.
महासंघाच्या वतीने २० ऑक्टोबर २०१४पासून ठोक पगारावरील कामगारांना वेतनश्रेणी मिळावी यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. या कामगारांच्या वेतनश्रेणीबाबत महापालिका प्रशासनाकडे २० ऑक्टोबर २०१४ रोजी महापालिका प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारात उत्तर मागितले असता, प्रशासनाकडून त्याबाबत १४ सप्टेंबर २०१६ रोजी महासंघाला उत्तर देण्यात आले. विशेष म्हणजे या उत्तरावर २२ जानेवारी २०१५ची तारीख असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष शशिकांत आवळे यांनी दिली. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतानाही महापालिका प्रशासनाकडून टोलवाटोलवी करण्यात आलेली आहे. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता महासंघाला भलतीच माहिती देण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनात परिचारिका, डॉक्टर, न्हावी कामगार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, माहिती नोंदणी लिपिक, वैद्यकीय समाजसेवक, वाहनचालक, लिपिक, शस्त्रक्रिया सहाय्यक, लॅब असिटन्ट, बायो मेडीकल इंजिनिअर, लॅब टेक्निशियन, एक्स रे अटेडन्स, दूरध्वनी चालक, औषध निर्माता, लिपिक / टंकलेखक, लेखापाल, शिपाई, ए.एन.एम (सहाय्यक परिचारिका प्रसविका), टी.बी. हेल्थ व्हिजिटर, डेटा एंन्ट्री ऑपरेटर आदी पदांवर गेल्या अनेक वर्षापासून सुमारे ८५० कामगार ठोक पगारावर काम करत आहेत. या कामगारांना केवळ वेतनश्रेणीच लागू झाली पाहिजे असे नाही तर या वेतनश्रेणीबरोबर पूर्व लक्षी प्रभावाने फरकही (वेतनातील फरक) तात्काळ मिळावा यासाठी महासंघ पालिका प्रशासनदबारी पाठपुरावा करत आहे. ठोक मानधनावरील कामगारांना वेतनश्रेणी देण्यास पालिका प्रशासन करत असलेली टोलवाटोलवी महापालिका प्रशासनाच्या अंगलट येणार असून हा प्रश्न लवकरच मंत्रालयीन पातळीवरही छेडला जाणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष शशिकांत आवळे यांनी दिली.