मुंबई : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये शिवसेना असावी, यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असताना दुसरीकडे राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने मराठी मतांवर डोळा ठेवून आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू केल्या आहेत. ‘भारत बंद’दरम्यान राज्यात प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरांमध्ये मनसेच्या नावाचा जो काही बोलबाला झाला, त्याचीही या हालचालींना पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापल्या आघाड्यांमध्ये मित्रपक्षांना घेण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या बैठकीत ‘मनसे’ला आघाडीमध्ये सामावून घेण्याविषयी जाणीवपूर्वक चर्चा करण्यात आली. भाजपच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार आघाडी उघडली असून, आता राज्यातील युतीमध्ये मनसे शिरकाव करण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राज ठाकरे जे काही वातावरण निर्माण करतील, त्याचा फायदा मिळावा यासाठी आघाडीतील काही नेते प्रयत्नशील असल्याचे कळते. शहरी भागात, प्रामुखाने मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई या ठिकाणच्या मोठ्या प्रमाणातील मराठी मतांवर शिवसेना अवलंबून असते. शिवसेनेसोबत भाजपची युती असल्याने त्यांनी त्याचा फायदा होतो. त्यामुळे ही मते फिरवायची झाल्यास मनसे सोबत असावी, या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारप्रयत्नशील असल्याचे समजते. त्यात ‘भारत बंद’दरम्यान महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे येथील ‘बंद’मध्ये मनसेचा सहभाग ठळकपणे दिसून आल्याने शरद पवारांच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळाल्याचेही बोलले जात आहे.
याचाच पुढचा भाग म्हणून आघाडीच्या बैठकीत मनसेला सामावून घेण्याविषयी चर्चा झाली, तेव्हा या बैठकीत आघाडीतील बहुसंख्य नेत्यांना मनसेला आघाडीत सामावून घेण्याबाबत फारशी हरकत घेतली नसल्याचे कळते. काँग्रेसच्या संजय निरुपम गटाने मात्र या वेळी जोरदार विरोध केल्याचे कळते. मनसेला घेतल्यास मुंबईत मोठ्या प्रमाणावर असलेल्या उत्तर भारतीयांच्या मतांवर परिणाम होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केल्याचे कळते. त्यावर काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आक्षेप घेतल्याचे कळते. दक्षिण मुंबईमध्ये मोठ्या प्रमावर मराठी मते असून, शिवसेनेला टक्कर द्यायची असेल तर मनसे सोबत असणे योग्य ठरेल; एवढेच नव्हे तर उर्वरित महाराष्ट्रात नाशिक, औरंगाबाद, नगर अशा अनेक ठिकाणी मनसेची मदत घेता येईल, असेही ते म्हणाल्याचे कळते. यामुळे मनसेला घेण्याबाबत आघाडीच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्याची जवाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे असल्याने मनसेला आघाडीत घेण्याचा मुद्दा पवारच काँग्रेस नेतृत्वाच्या गळा उतरवतील, असे आघाडीतील नेत्यांना वाटते. मनसेने आघाडीत यावे याविषय राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी मनसेकडून मात्र अधिकृतरीत्या याबाबत काहीच समजू शकलेले नाही.
मनसेला २००९च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांमध्ये बारा जागांवर यश मिळाले असले तरी त्यानंतर झालेल्या २०१४च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत अवघ्या जुन्नर या एकमेव जागेवर मनसेला यश मिळाले होते. तथापि आघाडीच्या छावणीत मनसेच्या माध्यमातून राज ठाकरे ही तोफ आघाडीच्या छावणीत सामील झाल्यास प्रचारातून कॉंग्रेस राष्ट्रवादीतून राज ठाकरेंकरिता पायघड्या अंथरण्याचे काम सुरू झाले आहे. इतर पक्षाच्या तुलनेत मनसेचे कार्यकर्ते आक्रमक असल्याने ग्रामीण व शहरी भागात आघाडीला त्याचा अधिकच फायदा होण्याची शक्यता आहे.