कामे करा अन्यथा मोठे जनआंदोलन उभारु
नवी मुुबई : नवी मुंबईत वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले असून वीज सुधारणांची कामे वेळीच करा. नवी मुंबईकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. अन्यथा मोठे जन आंदोलन उभे करु, असा सज्जड इशारा आमदार संदीप नाईक यांनी महावितरणला दिला आहे.
वातावरणातील उकाडा कमालीचा वाढला असताना कोपरखैरणे, घनसोली, तळवली, गोठिवली, ऐरोली, दिघा, रबाळे, तुर्भे, वाशी, कोपरी आणि शहरातील उर्वरित सर्वच विभागांत वीज पुरवठा दिर्घकाळ खंडीत होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नवी मुंबईतील वीज समस्यांची सोडवणुक करण्यासाठी आमदार संदीप नाईक यांनी वाशी येथील कार्यालयात महावितरणचे अधिक्षक-अभियंता राजेश नाईक यांची शनिवारी भेट घेतली. नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होण्याअगोदर वीजेच्या समस्या मार्गी लावा, अन्यथा मोठे जन आंदोलन उभे करु, असा इशाराच आमदार नाईक यांनी या प्रसंगी दिला. त्यावर कोपरखैरणे आणि घनसोली विभागातील वीज पुरवठा येत्या आठवडाभरात सुरळीत करु. नवी मुंबईसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन जादा उपकरणांची तरतूद करु, असे आश्वासन अधिक्षक-अभियंता नाईक यांनी दिले.
मागील चार महिने आमदार नाईक हे शहरातील वीज समस्या नाहिशा करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. अलिकडेच त्यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेवून त्यांना वीज समस्यांचा एक सविस्तर माहिती अहवाल दिला होता. महावितरणचे कोकण विभागीय प्रादेशिक संचालक तसेच वाशी येथील महावितरणच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यांनाही अशाच प्रकारचा सचित्र अहवाल दिला होता. वेळोवेळी बैठकाही घेतल्या होत्या. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे घनसोली, तळवली, गोठवली या भागासाठी महावितरणने २७ कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून त्याचा कृती आराखडाही तयार केला आहे. या भागांप्रमाणेच शहरातील उर्वरित सर्व भागांसाठी देखील वीज कामांचा आराखडा तयार करुन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली आहे.
ऑक्टोबर हिट सुरु असताना वारंवार दिर्घकाळ खंडीत होणार्या वीजेमुळे नवी मुंबईकर हवालदिल झाले आहेत. त्यामुळे येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीच्या आणि दिर्घकालिन उपाययोजना करण्याची मागणी आमदार नाईक यांनी अधिक्षक-अभियंत्यांंकडे केली.
महावितरणमधील बैठकीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना आमदार नाईक म्हणाले की, महावितरणकडे पाठपुरावा केला की काही ठिकाणी कामे होतात मात्र काही ठिकाणची कामे कधी प्रलंबित तर कधी अर्धवट राहतात. कोपरखैरणे भागात ट्रान्सफार्मर आणि इतर उपकरणे दुयम दर्जाची बसविली आहेत, अशी नागरिकांची माहिती आहे. नवी मुंबईसाठी नेमणूक केलेला कर्मचारीवर्ग बाहेर हलविण्यात आला आहे. त्यांना पुन्हा येथे आणले पाहिजे. जादा उपकरणे आणि साहित्य उपलब्ध करुन कामाची गती वाढवली पाहिजे. ५ हजार नविन विद्युत मिटरची मागणी ग्राहकांकडून आहे. त्यांना लवकरात लवकर मिटर दिले गेले पाहिजेत.
सर्वाधिक उत्पन्न नवी मुंबईतून महावितरणला भेटते. १०० टक्के वसूली होते. मग नवी मुंबईकरांची गैरसोय का? हा आमचा सवाल आहे.
– संदीप नाईक, आमदार
—————————— —————————— —————————— —————————— —————————— —
आमदार संदीप नाईक यांनी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे महावितरण विषयक कामे मोठया प्रमाणावर नवी मुंबईत झाली आहेत. सात वर्षांपूर्वी इन्फ्रा-२ या योजनेअंतर्गत कोटयवधी रुपयांची कामे मार्गी लागली होती. त्यानंतर आयपीडीसी या योजनेमधूनही अनेक कामांना मूर्त रुप मिळाले. अनेक ठिकाणी ट्रान्सफार्मर बसले,
सबस्टेशन निर्माण झाले आहेत. विद्युत सुधारणांची कामे झाली आहेत.
—————————— —————————— ———————–