नवी मुंबई : नवी मुंबईच्या कानाकोपर्यात महापालिका प्रशासनाने लावलेले दिशादर्शक फलक व त्यावर त्या त्या भागातील स्थानिक नगरसेवकांची नावे पहावयास मिळतात. पण आता त्या दिशादर्शक फलकावरून नगरसेवकांची नावे हद्दपार होणार आहेत. महापालिका आयुक्तांनीच ती नावे काढून टाकण्याचा आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. जनतेच्या पैशावर नगरसेवकांची चाललेली जाहिरातबाजी हा प्रकार महापालिकेचे ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांच्यामुळे उघडकीस आला आहे.
महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबई कार्यक्षेत्रात बसविण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांवर नगरसेवकांची नावे कशी बसविण्यात आली याबाबत पालिका प्रशासनाकडे विजय साळे यांनी विचारणा केली असता, पालिका प्रशासनाला कोणत्याही प्रकारचे उत्तर देता आले नाही. दिशादर्शक फलक बसविताना महापालिका प्रशासनाचा पर्यायाने करदात्या नागरिकांचा पैसा खर्च झालेला असताना त्या त्या भागातील नगरसेवकांची नावे या फलकावर कशी असाही प्रश्न विजय साळेंनी विचारला असता पालिका प्रशासनाला कोणतेही उत्तर देता न आल्यामुळे नगरसेवक व पालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाची हातमिळवणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विजय साळे यांच्या पाठपुराव्यामुळे आयुक्तांनी आठ दिवसाच्या आता दिशादर्शक फलकावरील नगरसेवकांची नावे काढून टाकण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
विजय साळे यांनी पालिकेच्या पैशावर दिशादर्शक फलकांच्या माध्यमातून नगरसेवकांची सुरू असलेली चमकेशगिरी उजेडात आल्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये विजय साळे चर्चेचा विषय बनले आहेत. दिशादर्शक फलकावरून आपली नावे जाणार असल्याने अनेक नगरसेवकांचा तीळपापड झाल्याचे पालिका मुख्यालयात पहावयास मिळाले आहे. प्रभाग समिती सदस्यांच्या माध्यमातून लोकनेते गणेश नाईकांनी मनोज मेहेर, विजय साळेसारख्या खर्या अर्थांने जनसेवा करणार्या व गणेश नाईकांना अभिप्रेत असणार्या जनकल्याणकारी कामांचा पाठपुरावा करणार्या समाजसेवकांची निवड झाल्याचे समाधान नवी मुंबईकरांकडून व्यक्त केले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही नगरसेवक लोकनेते गणेश नाईकांचे नाव वापरून प्रभाग समिती सदस्यांवर दबाव टाकत असल्याचे नवी मुंबईकरांनाही आता समजू लागले आहे.