नवी मुंबई:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून बेलापूर विधानसभेच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून नवी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाशी येथे “महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा” काढण्यात आली. सदर पदयात्रा वाशी मिनी सिशोर ते सेक्टर-9 वाशी पर्यंतचा परिसर स्वच्छता करीत काढण्यात आली. यावेळी बेलापूर विधानसभेच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. रामचंद्र घरत, भाजपा नवी मुंबई प्रभारी श्री. संजय उपाध्याय, महिला मोर्चा अध्यक्षा दुर्गा ढोक,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, निलेश म्हात्रे, राजू तिकोणे उपस्थित होते.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, जात, पात, धर्म, पंथ, प्रांत, पक्ष अशा सर्वांच्या वर असलेले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य असून जगाला सत्य व अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ही स्वच्छता संवाद पदयात्रा काढण्यात आलेली आहे. महात्मा गांधीजी यांनी सर्वासाठी शौचालये नसतील तर स्वराज्याला अर्थ नाही असे सांगत अस्वच्छतेविरोधातील लढ्याला त्यांनी महत्व देत त्यांनी झाडू हाती घेतला. त्यापासून प्रेरणा घेत देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेन्द्रभाई मोदीजी यांनी “स्वच्छ भारत अभियान” हि लोकचळवळ सुरु केली. देशात 9 कोटी शौचालय बांधत सुमारे 5 लाख गावे हागणदारीमुक्त केली तर महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्या सरकारने संपूर्ण महाराष्ट्र हागणदारी मुक्त करीत स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहचविला. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार होत असल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करीत असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. आज महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून माझ्या बेलापूर विधानसभा क्षेत्रात “महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा” काढून स्व्च्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी हा उद्देश असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.