प्रशासनाकडून कागदपत्रांच्या नावाखाली ग्रामस्थांची सुरू आहे पिळवणूक
नवी मुंबई : कागदपत्रांच्या अभावी नवी मुंबईचे मुळ भूमीपुत्र असणार्या आगरी-कोळी समाजाची प्रशासनदरबारी ससेहोलपट सुरु आहे. शाळेच्या दाखल्यावर हिंदू महादेव कोळी असा स्पष्ट उल्लेख असताना जातीचा दाखला देण्यास आडकाठी प्रशासनच करत आहे. याशिवाय सादर केलेली कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालये अपुरी असल्याचे सांगत असल्याने आम्ही स्थानिक भूमीपुत्र आहोत का बांगलादेशी आहोत तेच समजत नाही असा संंताप आता नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाकडून उघडपणे व्यक्त केला जावू लागला आहे. सारसोळे गावचे विकासपर्व असणार्या मनोज यशवंत मेहेर यांनी राज्याचे मुख्यमंत्री व ठाण्याच्या पालकमंत्र्यांकडे लेखी तक्रार करत नवी मुंबईच्या मूळ भुमीपुत्रांना भेडसावणार्या जातीच्या दाखल्याविषयीच्या समस्येकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.
नवी मुंबईतील मुळ भूमीपुत्र असणार्या आगरी-कोळी समाजाच्या जातीच्या दाखल्याविषयी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. मंत्रालयीन पातळीवरून तातडीने कार्यवाही न झाल्यास नवी मुंबईचे मूळ मालक असणार्या आगरी-कोळी समाजावर बांगलादेशी नागरीक असा शिक्कामोर्तब होण्याची भीती आज स्थानिक ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली आहे. मुंबईतील लोकसंख्येचे मुंबईनजीकच पुनर्वसन करण्यासाठी नवी मुंबई शहर राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून विकसित केले. या भागातील स्थानिक आगरी-कोळी जनसमुदायाची खाडीतील मासेमारी व भातशेती हीच दोन उपजिविकेची माध्यमे होती. तथापि भूसंपादनामध्ये भातशेतीला कायमचे मुकावे लागले आणि शहरीकरणामुळे खाडीतील पाणी दूषित होवून मासेमारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे. त्यातच आता मुळ भूमीपुत्र असणार्या आगरी-कोळी समाजाला जातीचे दाखले मिळण्यात शासन दरबारी अडचणी निर्माण होवू लागल्याने नजीकच्या भविष्यात नवी मुंबईतील ग्रामस्थांना जातप्रमाणपत्राअभावी त्यांच्या अस्तित्वावरच प्रशासनदरबारी प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती वाटू लागली आहे.
नवी मुंबईतील आगरी-कोळी समाज हा पूर्वी महादेव कोळी (एस.टी) या जातीमध्ये मोडला जात होता, पण राज्य सरकारने मधल्या काळात या आगरी-कोळी समाजाला विशेष मागासवर्गीय (एसबीसी) या प्रवर्गात मोडले. तथापि एसटीमधून या समाजाला एसबीसीमध्ये प्रशासनाने ढकलले तरी या आगरी-कोळी समुदायाला जातीचे प्रमाणपत्र भेटत नाही. मुळातच हा समाज प्रारंभापासून अशिक्षित असल्याने यांच्याकडे फारशी कागदपत्रे नाहीत. त्यातच जी मुले आता शाळेत शिक्षण घेत आहेत, त्यांच्या शाळेच्या लिव्हिंग प्रमाणपत्रावर हिंदू महादेव कोळी असा स्पष्टपणे उल्लेख आहे. शैक्षणिक कामासाठी जातीच्या दाखल्यासाठी आवश्यकता असते. शाळेच्या दाखल्यावर जातीचे प्रमाणपत्र भेटत नाही. १९५७चा पुरावा, शिधावाटप पत्रिका, पॅनकार्ड. मतदार यादीचा पुरावा, शाळेचा दाखला आदी कागदपत्रे सादर करूनही जिल्हाधिकारी कार्यालयातून आगरी-कोळी समाजाला जातीचे दाखले भेटत नाही. त्यातच आगरी-कोळी समाजामध्ये घरटी काही ना काही वाद असल्याने कोणी कोणाला शासकीय कामासाठी कागदपत्रेही उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजापुढे आता जातीचा दाखला ही गंभीर समस्या निर्माण झालेली आहे.
याप्रकरणी मनोज मेहेर यांनी मंत्रालयीन पातळीवर मुख्यमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करताना समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून आपण युध्दपातळीवर कार्यवाही करून नवी मुंबईतील मुळ भूमीपुत्र असलेल्या आगरी-कोळी जातीचे प्रमाणपत्र देणेबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत आणि आपल्या निर्देशावर संबंधित विभाग काय कारवाई करत आहे, याचाही आपण वेळोवेळी आढावा घ्यावा, अशी मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे.