नवी मुंबई : सारसोळे गाव आणि नेरुळ सेक्टर सहा परिसरातील मुख्य व अर्ंतगत रस्त्यालगत असलेल्या गटारांचे हेवीड्यूटी गटारांमध्ये परिवर्तन करण्याची मागणी महापालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य आणि सारसोळे गावचे विकासपर्व म्हणून गेल्या काही वर्षापासून ओळखले जाणारे मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी, महापौर जयवंत सुतार आणि महापालिका विभाग अधिकार्यांकडे एका लेखी निवेदनातून शुक्रवारी (दि. ५ ऑक्टोबर) रोजी केली आहे.
सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात वाहन पार्किगची समस्या गेल्या काही वर्षापासून भयावह स्वरूप धारण करू लागली आहे. परिसर विकसित झाल्यामुळे नागरीकरण झपाट्याने वाढले. लोकसंख्येत वाढ झाली. लोकांच्या राहणीमानात सुधारणा झाल्याने वाहनांची संख्याही वाढत गेली. घराघरामध्ये दुचाकी व चारचाकी वाहने येवू लागली. वाहनांची संख्या वाढली तरी जागा मात्र तेवढीच राहील्याने वाहने कोठे उभी करावीत यावरून वाद होवू लागले आहे.खासगी इमारती, गावठाणातील इमारती, सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्यांसमोरील रस्त्यांवर दोन्ही बाजूला वाहने उभी राहू लागल्याने ये-जा करणार्या वाहनांना अडथळे निर्माण होवू लागले आहे. त्यातव गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भाडेकरूंच्या वाहनांना स्थान नसल्याने त्यांची वाहने रस्त्यावरच उभी असतात. सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात वाहतुक कोंडीची आणि वाहन पार्किगची समस्या सोडविण्यासाठी सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहामधील मुख्य आणि अर्ंतगत रस्त्यालगतच्या गटारांचे हेवीड्यूटी गटारांमध्ये रूपांतरीत करणे काळाची गरज आहे. गटारांचे हेवीड्यूटी गटारांमध्ये रूपांतर झाल्यास वाहन पार्किगची समस्या काही प्रमाणात कमी होईल आणि वाहतुक कोंडीची समस्या कायम स्वरूपी संपुष्ठात येईल. आपण स्वत: नेरूळ सेक्टर सहा परिसरात आणि सारसोळे गावात पाहणी केल्यास आपणास आमच्या मागणीचे व समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल. आपण पाहणी करण्यासाठी याल, त्यावेळी पाहणी अभियानात आम्हाला सहभागी करून घ्यावे असे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.