नवी मुंबई : नेरुळ सेक्टर ८ मधील कै. साहेबराव शेरे उद्यानातील दिवाबत्तीत सुधारणा करण्याची लेखी मागणी प्रभाग ८७च्या शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी नुकतीच महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
प्रभाग ८७ मध्ये नेरूळ सेक्टर ८ मध्ये महापालिकेचे कै. साहेबराव शेरे उद्यान आहे. या उद्यानाच्या सभोवताली सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या असून तेथील रहीवाशी सकाळ, सांयकाळी व रात्री उशिरा उद्यानात विसावा घेताना आपणास पहावयास मिळतील. या उद्यानात महापालिका प्रशासनाकडून दिवाबत्तीची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी ती पुरेशी नाही. दिवाबत्तीतून पडणाराप्रकाश माफक नसल्याने रात्रीपण अंधारच काही भागात पहावयास मिळतो. आपण या ठिकाणी स्वत: येवून पाहणी केल्यास आपणास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल. सध्या महिला व्याभिचाराच्या वाढत्या घटना पाहून अपुर्या उजेडामुळे उद्यानात गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
समस्येचे गांभीर्य पाहता उद्यानात माफक उजेड असणे आवश्यक आहे. महिला सुरक्षिततेला प्राधान्य देण्याकरिता आहे त्या दिवाबत्तीमध्ये सुधारणा करून अधिकाधिक उजेड पडेल याची पालिका प्रशासनाने लवकरात लवकर व्यवस्था करावी. आवश्यकता भासल्यास अधिकाधिक पथदिवे उद्यानात आपण लावावेत अशी मागणी शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.