नवी मुंबई : जनता आणि अधिकार्यांचा सुसंवाद घडवून नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करणारा आमदार संदीप नाईक यांचा ऐरोली विभागाकरिताचा जन संवाद उपक्रमात एकूण ३३० निवेदने प्राप्त झाली. या पैकी ६० टक्के निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली तर उर्वरित ४० टक्के निवेदनांचा निपटारा करण्यासाठी कालबध्द पाठपुरावा केला जाणार आहे.
रविवार सुटटीचा दिवस असूनही ऐरोलीचे लेवा पाटीदार सभागृह जन संवादासाठी तुडूंब भरले होते. महानगर गॅस, महावितरण, महापालिका, कांदळवन विभाग, पोलीस, आरटीओ, सिडको, शिधावाटप,मेरिटाईम बोर्ड, वाहतुक नियंत्रण पोलीस इत्यादी १९ शासकीय आणि निमशासकीय खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापौर जयवंत सुतार यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
जन संवादाची प्रस्तावना करताना आमदार संदीप नाईक यांनी जनतेशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतो आणि ते सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो, अशी भुमिका मांडली.
आमदार नाईक यांच्या प्रयत्नांतून ऐरोली विभागात अनेक सोसायटयांमध्ये महानगर गॅसची जोडणी मिळाली आहे मात्र आजही अनेक सोसायटया, गाव, गावठाणे, बैठया चाळी, एलआयजी, एमआयजी, कंडोमिनियम वसाहतींमधून जोडणी मिळाली नसल्याची बाब नागरिकांनी निदर्शनास आणली. दिनेश पाटील, दिपक पाटील, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी याविषयीचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर जेथे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत नसेत तेथे मागेल त्यांना तात्काळ महानगर गॅसची सुविधा पुरविण्याची सुचना महानगर गॅसच्या अधिकार्यांना आमदार नाईक यांनी केली. उर्वरित ठिकाणी तांत्रिक बाबी तपासून वरिष्ठांशी चर्चा करुन जोडणी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निेर्देश दिले.
शिधावाटप दुकानांमधून धान्य मिळत नसल्याची तक्रार जितेंद्र पारेख व इतर रहिवाशांनी केली. त्यावर या विरोधात संबधीत अधिकार्यांकडे तक्रार करा. त्यानंतरही काही कारवाई झाली नाही तर मला सांगा. काळाबाजार करणारी दुकाने कशी बंद होतील, याची तजवीज आपण दक्षता समितीच्या सभेत करु, असा इशारा आमदार नाईक यांनी दिला. शिधावाटप कार्यालयाच्या संबधी कामांसाठी ऐरोलीकरांना ठाण्याला जावे लागते. यामध्ये त्यांचा वेळ व पैसा वाया जातो. ऐरोलीसाठी स्वतंत्र शिधावाटप कार्यालय व्हावे, यासाठी आमदार नाईक प्रयत्नशील आहेत. त्या करीता पालिका आणि सिडकोने देखील जागा व अन्य बाबींसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शहाजी पाटील, रोहिदास गायकर, अण्णा सुर्यवंशी, ऐरोली रहिवासी महासंघाचे श्री मंत्री आदी नागरिकांनी डिम्ड कन्व्हेयन्स, असोसिएशनसाठी सिडकोकडून ऑफीस, ट्राय पार्टी ऍग्रीमेंट या विषयी तक्रारी केल्या. डिम्ड कन्हेयन्स तसेच ट्राय पार्टी ऍग्रीमंेंट पुन्हा सुरु करणे, असोसिएशनला जुन्याच दरात ऑफीस उपलब्ध करुन देणे या विषयी सिडकोचे एमडी लोकेशचंद्र यांच्याशी बैठक घेवून हे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले. सेक्टर १५ येथील सिडकोनिर्मित वापरात नसलेला बाजार आहे. बाजाराची ही इमारत पालिकेकडून हस्तांतरित करुन अन्य सुविधांसाठी वापरात आणावी, अशी सुचना माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी केली असता संपूर्ण नवी मुंबईसाठी अशाप्रकारे सुविधा भुखंड हस्तांतरण करण्यासाठी चर्चा झाली झाल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली. शिवकॉलनीमधील घरांच्या दुरुस्तीसाठी परवानगी मिळावी, यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. सेक्टर १४ येथे सुन्नी मुस्लीम पंथासाठी शेख गुरुजी यांनी मस्जीद तसेच मोलाना कलाम आझाद भवन या दोन मागण्या केल्या. महापौर सुतार यांनी त्यावर उत्तर देताना लोकनेते गणेश नाईक यांच्या निर्देशानुसार शहरात विविध धर्मियांसाठी भवन उभे राहिले आहेत सुन्नी मुस्लीम पंथासाठी देखील हे काम करु, अशी ग्वाही दिली. पार्कीगची सोय होत नसेल तर सिडको व पालिका घर दुरुस्तीसाठी परवानगी देत नाही, ही बाब जन संवादात नागरिकांनी मांडली. त्यावर या प्रश्नी कोर्टाचा निर्णय असून पालिकेने आयआयटी कडून सर्व्हेक्षण करुन घेतले आहे. नवी मुंबई संदर्भातला हा आयआयटीचा अहवाल कोर्टात मांडून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करु, अशी माहिती महापौर सुतार यांनी दिली. लालचंद पाटील यांनी गावठाण विस्ताराचा विषय उपस्थित केला. यावर भुमिका मांडताना गाव-गावठाणांचे सर्व्हेक्षण रहिवासी व व्यावसायिक बांधकामे नियमित करण्यासाठीची व्हायला हवे, असे सांगून सीआरझेडमधून कोळीवाडे वगळावेत यासाठी विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अगोदर आहे त्या ठिकाणी व त्या स्थितीत बांधकामे नियमित करण्याची मागणी लावून धरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. चंदनू मढवी यांनी दिवा-कोळीवाडा येथे मच्छी मार्केट, नगरसेविका मोनिका पाटील यांनी घनसोली सेक्टर१६ येथे मच्छी-मटन मार्केटची मागणी केली असता याबाबत माहिती घेवून धोरणात्मक निर्णय घेण्याची ग्वाही महापौरांनी दिली. आमदार नाईक यांच्या पाहणीदौर्यानंतर पटणी रोडची गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. आता हा रस्ता कॉंक्रीटचा करण्यासाठी पालिकेने ५० कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. या बददल येथील रहिवाशांनी जन संवादात आमदार नाईक यांचे जाहिर आभार मानले. मुंब्रा बाहयवळण रस्त्याच्या दुरुस्तीमुळे नवी मुंबईकरांना चार महिने प्रचंड वाहतुककोंडीला सामारे जावे लागले. शहरातील अंतर्गत रस्ते खराब झाले. अशी परिस्थीती पुन्हा उदभवू नये यासाठी पोलीस, वाहतुक नियंत्रण विभाग, रस्ते महामंडळ, पालिका या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन नियोजन करावे, कृती आराखडा तयार करावा, असा सल्ला आमदार नाईक यांनी दिला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी बिट चौक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यामधून पोलीस नियुक्त करावेत. चैन स्नॅचिंग व इतर गुन्हे होवू नये यासाठी सीसीटिव्ही कॅमरे बसवावेत, आयटी कंपन्यांमुळे एरोलीत होणारी वाहतुककोंडी फोडण्यासाठी या कंपन्यांसाठी नियमावली तयार करावी, रस्त्यावरील बेवारस वाहने उचलून न्यावीत अशा सुचना केल्या. महावितरण संबधीच्या समस्यांचा पाढा वेळोवेळी महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांसमोर वाचला आहे. काही कामे सुरु झाली आहेत मात्र कामांचा वेग वाढवायला हवा अन्यथा जन प्रक्षोभ निर्माण होईल, असा इशारा आमदार नाईक यांनी उपस्थित महावितरणच्या अधिकार्यांना दिला. त्यासाठी ऍक्शन प्लॅन बनविण्याची सुचना केली. आमदार नाईक यांच्या पाठपुराव्यातून ऐरोली येथे नाटयगृह मंजूर झाले आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे हे काम थांबले आहे यावर महापौर सुतार यांनी उत्तर देत येत्या दिवाळीपूर्वी नाटयगृहाचे काम सुरु होईल, असे आश्वासन दिले. ऐरोली संघर्ष समितीच्या वतीने किरण न्यायनित यांनी पालिका रुग्णालयातून जनरिक औषधे व सोनोग्राफीची सोय द्यावी, अशी मागणी केली. टोलमुक्तीसाठी आमदार महोदयांकडे मागणी केली. महापौरांनी या दोन्ही मागण्यांवर सकारात्मकता दर्शविली. विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात टोलमुक्तीची मागणी लावून धरतो यापुढे देखील हीच भुमिका राहिल, असे आमदार नाईक म्हणाले. दिपक पाटील, चंदन मढवी आणि कोळी बांधवांनी दिवा जेटटीवर कांदळवण अधिकार्यांकडून रस्ता बंद केल्याचा विषय उपस्थित केला. त्यावर कोळी बांधवांना तात्काळ ओळखपत्र वितरित करुन जेटटीवर प्रवेश द्यावा, असे निर्देश आमदार नाईक यांनी दिले. ऐरोली येथील जैव विविधता केंद्र भारतात अव्वल पर्यटनस्थळ बनेल, असा विश्वास व्यक्त करुन या ठिकाणी आमदार निधीतून ई टॉयलेट बांधणार असल्याची माहिती दिली.
पालिका अधिकारी भिमा विरनक, अनिल पाटील, अशोक मढवी, अभय जाधव, गुमास्ते, अतिक्रमण विरोधी विभागाचे उत्तम खरात, मालमत्ता विभागाचे हेमंत सोनावणे, समाजविकासचे प्रकाश कांबळे तलाठी राठोड, यादव, आरटीओचे संजय भोसले, एमआयढीसीचे एम एस कुलकर्णी, वाय के मेश्राम, वाहतुक शाखेचे तनवीर शेख, एमआयडीसीचे पी डी तळेकर, पी व्ही चौधरी, भूमापक एन डी संगारे आदी अधिकारी जन संवादास उपस्थित होते.
चौकट…
या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक..
ज्यांनी महानगर गॅसच्या जोडणीची मागणी केली आहे. त्या ठिकाणचा तांत्रिक अधिकार्यांबरोबर
लोकेशन सर्व्हे करुन शक्य तेथे गॅसची जोडणी देण्यात येईल, गॅसची बीले जास्त येत असतील तर ती पुढच्या बीलांमध्ये सामावून घेवू, असे आश्वासन महानगर गॅसचे अधिकारी सुनिल केसरकर यांनी जनसंवादात दिले. रेशनिंग बाबत काही तक्रार असल्यास कुठे तक्रार करावी? याविषयी सामान्यांना माहिती नसते. शिधावाटप दुकानांबाहेर हे मोबाईल क्रमांक लावणार असल्याचे शिधावाटप अधिकारी जितेंद्र धोत्रे यांनी सांगितले. शिधावाटप योजनांची माहिती जनतेपर्यत पोहचवू, अशी ग्वाही दिली. डिम्ड कन्हेयन्सबाबत सिडकोच्या जॉईंट रजिस्टरकडे अर्ज करावा, त्यावर कार्यवाही करु, असे सिडकोचे अधिकारी करण शिंदे म्हणाले. दिवा जेटटीवर कोळी बांधवांना कोणताही त्रास देणार नाही, असे कांदवळणाच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले. नो पार्किंग व सम-विषम पार्कीगचे नियम न पाळणार्यांच्या गाळया टोचन करु, असे वाहतुक नियंत्रणचे सहायक पोलीस निरिक्षक सचिन खोंद्रे यांनी सांगितले. ग्राहकांच्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी महावितरण ऍक्शन प्लॅन तयार करणार आहे. आमदार संदीप नाईक यांच्या सुचनेनुसार दिव्यांगासाठी स्वतंत्र पार्कीगची व्यवस्था पालिका करणार आहे.
चौकट…
अपंगाला आधार
जनसंवाद कार्यक्रमात अशोक डोईफोडे या अपंग बांधवाला आमदार संदीप नाईक यांच्या वतीने सायकलचे वाटप करण्यात आले. या सायकलच्या मदतीने डोईफोडे स्वतंत्रपणे प्रवास करुन आपली दैनंदिन कामे कुणाच्याही मदतीशिवाय स्वतंत्रपणे करु शकतील.