नवी मुंबई:- विस्तारित गावठाणाचे सिटी सर्वेक्षण बाबत ग्रामस्थांमध्ये असलेल्या संभ्रमासंदर्भात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नुकताच सानपाडा ग्रामस्थांबरोबर सुसंवाद साधला. विस्तारित गावठाणाच्या सिटी सर्व्हेबाबत काही विरोधकांकडून अफवा पसरविल्या जात असून ग्रामस्थांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे. यावेळी सानपाडा गावचे माजी सरपंच श्री. रामा मढवी, वसंत म्हात्रे, नगरसेवक सोमनाथ वास्कर, कोमलवास्कर, समाजसेविका सरोज पाटील, प्रमिला मढवी उपस्थित होते.
यावेळी सानपाडा गावचे माजी सरपंच रामा मढवी यांनी सांगितले कि, मी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे काम खूप जवळून पहिले असून प्रकल्पग्रस्तांसाठी त्या एक आधारस्तंभ आहेत. गेल्या 15 वर्षापूर्वी आपल्या प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचा मिठागरांचा प्रश्न त्यांनी अत्यंत शिताफीने सोडविला होता. त्यावेळी या लढ्यात मी सुद्धा त्यांच्या सोबत सहभागी होतो. सर्व मिठागर प्रकल्पग्रस्त बांधवांना भूखंड मिळणार असल्याचे समजताच तसेच त्याचे श्रेय दुसऱ्या कोणाला मिळू नये यासाठी आपल्याच तत्कालीन नेत्यांकडून बैठक कशी उधळविण्यात आली होती याचा पाढाच वाचायला त्यांनी सुरुवात केली. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे सर्व विषय अतिशय शिताफीने हाताळले असून विस्तारित गावठाणाचा विषय सुद्धा त्यांनीच पटलावर आणल्यामुळे सदर विषयही त्या सोडवतील अशी अशा व्यक्त करून त्यांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले.
स्थानिक नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी ग्रामस्थांच्या वतीने गावातील समस्या व मागण्यांसंदर्भात आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना सांगताना दत्त मंदिर, गावकी तलाव ग्रामस्थांना मिळवून देण्यात यावी अशी मागणी केली. आज गावामध्ये सर्व पक्षीय ग्रामस्थ एकत्र जमली असून सर्व आजी माजी नेते, सरपंच एकाच व्यासपीठावर पहिल्यांदा पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचा विषय हा माझा जिव्हाळ्याचा विषय असून विस्तारित गावठाण संदर्भात सानपाडा ग्रामस्थांनी पुढाकार घेतला त्याबद्दल आनंद वाटत आहे. विधान परिषदेची आमदार असताना मिठागर प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला होता. आपल्याच काही नेत्यांकडून बैठक उधळविण्यात आली व माझ्या प्रकल्पग्रस्त भगिनींना भूखंड मिळू शकले नाही, ही आजपर्यंत मला खंत आहे. 2015 पूर्वीची सर्व घरे नियमित करण्यात येणार असून गावठाणातील घरांना हात लावण्याची कोणाची हिम्मत नाही.त्यामुळे घाबरण्याचे कारण नसून यापुढे नवीन घर बांधताना 8ए चा उतारा व आर्किटेक्टचा प्लान सादर व अर्ज करून परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले. मूळ गावठाण बरोबरच विस्तारित गावठाणाचा सर्व्हेही येत्या 15 दिवसांत सुरु होणार असून ग्रामस्थांनीही विरोध न करता शासकीय अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यात आले पाहिजे. विस्तारित गावठाणामध्ये 200 मीटरपर्यंतच्या घरांचा सिटीसर्व्हे तात्काळ करण्यात येणार असून त्याचे प्रॉपर्टी कार्डही मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील जुन्या राज्यकर्त्यांनी अनेक कंपन्या, क्वारी बंद पाडून नवी मुंबईच्या विकासात खोडा घातला व आपल्या ग्रामस्थांना बेरोजगार होण्यास भाग पाडले. जुने राज्यकर्ते व अनेक बोगस प्रकल्पग्रस्त संघटना यांनी जमिनी हडप केल्यामुळे ग्रामस्थांवर ही वेळ आल्याचे सांगत त्यांचा खरपूस समाचार घेतला. परंतु ग्रामस्थांनी 100% जमिनी नवी मुंबईच्या विकासाला दिली असून आम्ही पहिले पण येथे राजे होतो, आत्ताही आहोत आणियापुढेही राजेच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील दत्त मंदिराच्या आवारातील जागा दत्त मंदिर संस्थेला मिळणेबाबत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दालनात बैठक झाली असून ती जागा मिळवून देण्याचे काम माझे असून त्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. तसेच गावातील तलाव व मैदानासाठीही प्रयत्न करणार असून माझ्या प्रकल्पग्रस्त बंधू भगिनींचे जे काही प्रश्न, समस्या असतील त्या साठी माझे घर 24 तास उघडे असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.