नवी मुंबई : मोदी सरकारला सत्तेची मस्ती असून त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असल्याची घणाघाती टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी केली आहे. सळसळत्या उत्साहाचे राष्ट्रवादी तरुणच आता देशात बदल घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा कोकण विभागीय मेळावा सोमवारी वाशी येथील विष्णूदास भावे नाटयगृहात पार पडला. त्या प्रसंगी अजितदादा तुडूंब भरलेल्या सभागृहात युवकांना मार्गदर्शन करीत होते. लोकनेते गणेश नाईक, माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार संदीप नाईक, प्रदेश राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष संग्राम कोते-पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, आमदार अनिकेत तटकरे, युवानेते पार्थ पवार, नवी मुंबई राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी महापौर सुधाकर सोनावणे, कामगारनेते श्रषिकांत शिंदे, युवकअध्यक्ष सुरज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
अजितदादांनी आपल्या खास शैलीत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. ते म्हणाले मोदी म्हणतात मै नही खाउंगा और खाणे दूंगा मात्र निरव मोदी, मेहूल चौक्सी, विजय मल्ल्या यांनी देश लुटला. नोटाबंदीमुळे रुपयाचे विक्रमी अवमुल्यन झाले आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, शेअर बाजारात सर्वसामान्यांचे १० लाख कोटी रुपये बुडाले आहेत. त्यावर मोदी बोलत नाहीत. पेट्रोल शंभरीच्या पार जाईल, अशी स्थिती आहे. एलपीजी गॅससाठी हजाराची नोट मोडावी लागली तर आश्चर्य वाटायला नको, असे सांगून सामान्यांच जीणे या सरकारने हालाखीचे केल्याचे अजितदादा म्हणाले. आघाडी सरकारच्या काळात उद्योगांमध्ये चांगली गुतवणुक व्हायची मात्र या सरकारच्या काळात नविन उद्योगधंदे तर सोडाच मात्र आहे त्यांचे रोजगार गेल्याची टिका त्यांनी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकांचे भुमिपूजन होवून दोन वर्ष उलटली तरी स्मारकाची एकही विट रचली नसल्याचे सांगून आता या स्मारकाची उंची कमी करण्याचे कारस्थान सरकार रचल असल्याचा आरोप त्यांनी केला.
शरदचंद्र पवार हे चतुरस्त्र विचार आणि आचारांचे नेते असून जाती, धर्माच्या पलिकडे जावून ते सामान्यांच्या हिताचा विचार करतात, असे प्रतिपादन लोकनेते गणेश नाईक यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी राज्य गहान ठेवू अशी भाषा मुख्यमंत्री करतात याचाच अर्थ राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. या सरकारविरोधात जनतेच्या मनात प्रचंड राग असल्याचे लोकनेते नाईक म्हणाले.
शशिकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात पक्षाची निष्ठा काय असते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे लोकनेते गणेश नाईक आहेत, असे गौरवोदगार काढले. राज्यात अजितदादा आणि कोकणात गणेशदादांच्या नेतृत्वाचे स्वागत असल्याचे शिंदे म्हणाले. राज्याचा पुढील मुख्यमंत्री अजितदादाच होतील, असे भाकितही वर्तविले.
लोकनेते गणेश नाईक यांनी लाटेतही नवी मुंबईवर राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा फडकविला. त्यांचा विजय सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. संजीव नाईक यांनी खासदार म्हणून लोकसभेत कौतुकास्पद काम केले. युवकांसाठी ते अनुकरणीय आहे, असे सांगून सुनिल तटकरे यांनी यापुढील काळात जातीयवादी सरकारविरोधात आणखी प्रखरपणे आंदोलन करण्याची तयारी युवांनी ठेवावी, असे आवाहन केले.
मोदी सरकारने निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, अशी टिका संग्राम कोते-पाटील यांनी केली. कोकणात बूथ कमिटयांचे काम उत्तमप्रकारे सुरु असल्याचे सांगून त्यांनी राष्ट्रवादी युवकांना प्रभावीपणे काम करण्यासाठी महत्वाच्या सुचना केल्या.
नवी मुंबईत बुथ लेवलचे काम मजबूतीने सुरु असून लोकनेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा विचार तळागाळापर्यत पोहचवित असल्याचे सुरज पाटील यांनी नमूद केले.