नवी मुंबई : परिसरात डासांचा उद्रेक वाढीस लागल्याने रहीवाशांना साथीच्या आजाराची लागण होवू लागली आहे. डासांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि साथीच्या आजाराचा उद्रेक टाळण्यासाठी प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर ८ आणि दहामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अर्ंतगत भागात धुरीकरण करण्याची मागणी शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्तांकडे आणि नेरूळ नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांकडे केली आहे.
प्रभाग ८७ मध्ये नेरूळ सेक्टर ८ आणि १० मधील काही गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश होत आहे. सध्या डासांची घनता वाढीस लागल्याने परिसरात डासांचा उद्रेक झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी तर सोडा परंतु गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातही रहीवाशांना बसणे, चालणेही अवघड होवून बसले आहे. केवळ तळमजल्यावरच नाही तर तिसर्या, पाचव्या मजल्यावरही घरात बसणे, अगदी गच्चीवरही फिरणे रहीवाशांना अवघड होवून बसले आहे. डासांमुळे मलेरियाचे रूग्णही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये दिसू लागले आहे. साथीच्या आजाराचा उद्रेक होवू नये यासाठी संबंधितांना तातडीने प्रभागातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात युध्दपातळीवर धुरीकरण मोहीम राबविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.