एप्रिल २०१९मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता राजकीय वातावरण आता पूर्णपणे ढवळून निघाले आहे. लढाईची वेळ निश्चित झाली असली तरी कोणी कोणाविरोधात लढायचे हे ठरविण्यासाठी आघाडी, युती, महायुती, तिसरी आघाडी, चौथी आघाडी आणि वेळ पडल्यास ‘एकला चलो रे’ची तयारी यासाठी राजकीय पटलावर घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. राजकारणात आणि प्रेमात सारे काही क्षम्य असल्याने निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरावयाच्या अखेरच्या दिवसापर्यत कोणत्याही घडामोडी घडू शकतात. सध्या भाजपा-शिवसेना या केंद्रातील व राज्यातील भागीदार असलेल्या मित्रांनी युतीबाबतचा ठोस निर्णय घेतलेला नाही. मागील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीतील दोन्ही पक्षातील कडवटपणा अद्यापि संपुष्ठात आलेला नाही. शिवसेनेने मागील काही महिन्यापासून सातत्याने ‘एकला चलो रे’ची घोषणा करत स्वबळावर सत्ता संपादनाचा नारा दिलेला आहे. त्यातच दोन दिवसापूर्वी शिवसेनेने आपल्या खासदारांची बैठक मतदारसंघांचा आढावा घेत स्वबळावर निवडणूका लढल्यास कितपत अनुकूल आणि कितपत प्रतिकूल ठरेल याचीही चाचपणी घेतली आहे. आजवर रिपाइंचे विविध घटक हे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तिसरी आघाडीच्या वळचणीला जावून आपले अस्तित्व सिध्द करण्याचा प्रयत्न करत असायचे. परंतु मागील लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांपासून राजकीय पटलावर रामदास आठवलेंच्या घडामोडीतून वेगळाच संदेश गेला आहे. रामदास आठवले हे भाजपाशी घनिष्ठ मैत्री ठेवू लागल्याने निळ्या रंगाचा प्रथमच भगव्या रंगाशी मिलाफ होत असल्याचे पहावयास मिळाले आहे. भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे ओवेसी यांच्यात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर युती झाल्याने व त्यांच्यात मनोमिलाफ वाढीस लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निळा रंगाचा हिरव्या रंगाशी होवू पाहणारा ‘मिले सूर तेरा मेरा’ यामुळे प्रस्थापितांची काही अंशी झोपच उडाली आहे. मुस्लिम व मागासवर्गीय मतदार एकत्रित आल्यास त्याचा फटका प्रामुख्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच बसणार असल्याने ओवेसी आणि अॅड. प्रकाश आंबेडकरांची होवू पाहणारी युती ही भाजपच्या चाणक्यांची खेळी असल्याचा आरोप दोन्ही कॉंग्रेसच्या नेतेमंडळींकडून केला जावू लागला आहे. युतीचा विचार करावयाचया झाल्यास शिवसेनेने स्वबळावर लढण्याची आपली ताठर भूमिका अद्यापि लवचिक केली नसली तरी भाजप मात्र त्यांची मनधरणी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून चर्चांना शुभारंभ झाला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रारंभीच्या टप्प्यात आक्रमकता दाखवित कॉंग्रेसला बॅकफूटला ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ५ खासदार तर कॉंग्रेसचे अवघे २ खासदार प्रतिनिधीत्व करत आहेत. जागावाटपाच्या सुरूवातीच्या वाटाघाटीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने अधिकाधिक जागांची मागणी करत काही जागांच्या अदलाबदलींची मागणीही केली आहे. मनसेची भूमिका मात्र तळ्यात मळ्यात असली तरी मनसेला आघाडी घेण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस कमालीची आग्रही आहे. मनसेला महाआघाडीत घेवून शिवसेना-भाजपची मराठी मते आपल्याकडे वळविण्याची खेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खेळली जात आहे. तथापि बोरिवली, भाईंदर, कांदिवली, नालासोपारा, भाईंदर येथील उत्तर भारतीय मतांवर डोळा ठेवून निरूपम व त्यांचे सहकारी एकीकडे जिवाच्या आकांताने मनसेला महाआघाडीत घेण्यास विरोध करत असतानाच दुसरीकडे मिलिंद देवरासारखी राहूल गांधींची मित्रमंडळी आपल्या लोकसभा मतदारसंघातील मराठी टक्का लक्षात घेवून मनसेला आघाडीत घेण्याचा आग्रह धरू लागली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका अवघ्या पाच महिन्यावर येवून ठेपलेल्या असतानाच राजकीय सारीपाटावर मित्रमंडळी गोळा करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. निवडणूकीला कोणते मुद्दे घेवून सामोरे याबाबत सत्ताधारी व विरोधी पक्ष अद्यापि ठाम नसले तरी निवडणूकीच्या आयपीएल स्पर्धेसाठी संघाची व खेळाडूंची निवड प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुर्तास राजकीय सारीपाटावर मित्र शोधण्याचा तर काही ठिकाणी जुन्या मैत्रीला उजाळा देण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. सैनिक गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. सरदार आपल्या गढीची डागडूजी करण्यात व्यस्त आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या कुरूक्षेत्रासाठी जमवाजमवीचा खेळ सध्या सुरू झालेला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी निश्चित असली तरी युतीबाबत अजून तुझ्या गळा आणि माझ्या गळाचा खेळ सुरूच आहे. अन्य राज्यात सुरू असलेले भाजपविरोधी वातावरण पाहता शिवसेनेसारखा जुना मित्र गमविणे भाजपच्या चाणक्यांना परवडणारे नाही आणि स्वबळावर १५ ते १८ खासदार निवडून येणे शक्य नसल्याची जाणिव शिवसेनेच्या सुप्रिमोलाही असल्याने तेही युतीबाबत ताठर भूमिका सोडून लवचिक भूमिका घेण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातल्या निवडणूकांची राजकीय व राष्ट्रीय पक्षांना उत्सूकता आहे. कारण प्रत्येकालाच आपली राजकीय ताकद आजमावयची आहे. एप्रिलपाठोपाठ ऑक्टोबर २०१९ला विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असल्याने लोकसभेच्या माध्यमातून सर्वांनाच महाराष्ट्रातील सत्तासंपादनाकरिता विधानसभा निवडणूकांची एकप्रकारे रंगीत तालीम करून घ्यावयाची आहे. निवडणूकांबाबत चर्चा करताना अन्य पक्षातील मातब्बरांना आपल्याकडे खेचण्यासाठीही जाळे रचले जात आहे. जानेवारीनंतर आयाराम-गयारामांचा खेळ जोरात सुरू होणार आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढताना अशोक चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कॉंग्रेस पक्षसंघटना जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. मागच्या निवडणूकीच्या तुलनेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढलेली आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाने आपली ताकद वाढविली आहे. रामदास आठवलेंच्या माध्यमातून आंबेडकरी समाज आपल्याकडे खेचू पाहणाऱ्या भाजपने सदाभाऊ खोतांच्या माध्यमातून शेतकरी चळवळीचा विश्वास संपादन करण्याचे काम सुरू केले आहे. समाजवादी पक्ष, बहूजन समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, रिपब्लिकन सेना आदी मंडळींना तर सध्या कोणी खिजगणतीतही जमा करत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
:-:- सौ. सुवर्णा पिंगळे-खांडगेपाटील