नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ८५ व ८६ पुरस्कृत आणि समृध्दी सेवाभावी संस्था आयोजित नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे मैदानावरील नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी झाली असून या उत्सवामध्ये सारसोळे, कुकशेत गावच्या ग्रामस्थांनी आणि नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांनी मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभाग ८५च्या नगरसेविका आणि नवी मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी केले आहे.
१० ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत हा नवरात्र उत्सव होणार असून या उत्सवातील देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. या उत्सवात दांडिया खेळावयास येणार्या महिलांसाठी दररोज एक पैठणी, महिला, पुरूष, मुलगा आणि मुलीसाठी उत्कृष्ठ नृत्य पारितोषिक तसेच उत्कृष्ठ दांडिया करणार्या जोडीसाठी बारबेक्यु/ टेम्टेशन, स्नॅक ऍटॅक हॉटेलचे कुपनही देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, नगरसेविका व सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील, नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सव साजरा होत असून यंदाचे चौथे वर्ष आहे. १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता दुर्गामातेचे आगमन होणार असून १८ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ५ वाजता देवी मातेच्या विसर्जन मिरवणूकीस सुरूवात होणार आहे.
या उत्सवामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, लहान मुलांसाठी चित्रकला, महिलांसाठी विविध स्पर्धा, महिलांचे हळदीकुंकू, भजन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा यासह उत्सव कालावधीत दररोज सकाळी ११ व सांयकाळी ७ वाजता दुर्गामातेची आरती आणि सांयकाळी ७.१५ ते १० दरम्यान रास दांडिया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.