* हिम्पामची पालिका आयुक्त, महापौरांकडे मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणार्या गोर गरीब जनतेला माफक दरात चांगले उपार घेता यावे या अनुषंगाने ‘होमिओपॅथी‘ बाहय रुग्ण विभाग सुरु करण्यात यावा, अशी मागणी हिम्पाम, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.एस.टी.गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व हिम्पाम, नवी मुंबईचे अध्यक्ष व कोपरखैरणे ‘ई‘ प्रभाग समिती सदस्य डॉ.प्रतिक तांबे यांच्यासह एका शिष्ट मंडळाने नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर जयवंत सुतार व पालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांची लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
नवी मुंबई मधील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी नमुंमनपाच्या रुग्णालयात विविध आजारांवर उपचार केले जातात. परंतु केवळ आधुनिक वैद्यकशास्त्रच नव्हे तर ‘आयुष‘ या शास्त्रांनेही अनेक आजार बरे होण्यास मदत होते व नागरीकांचा कल आयुष शास्त्राकडेही वाढत चालला आहे. यामधील ‘होमिओपॅथी‘ हे शास्त्र अनेक आजारांवर, रोगांवर गुणकारी सिध्द होत आहे व हे औषधोपचार अतिशय वाजवी दरात उपलब्ध आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन पालिकेने सर्वसामान्य रुग्णांसाठी ‘होमिओपॅथी‘ सुविधा देण्याचे निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी बोलातना नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार म्हणाले की, नमुंमनपाने नेहमीच लोकांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य दिलेले आहे व रुग्णांचे व नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून सर्वोतोपरी आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम केलेले आहे. ‘होमिओपॅथी‘ सुध्दा अनेक आजारांवर गुणकारी असुन, निश्चित आपल्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल.
हिम्पामच्या शिष्ट मंडळाने पालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी आयुक्तांनी याबाबत लवकरच निर्णय घेवु अशी ग्वाही या शिष्टमंडळास दिली.
याप्रसंगी हिम्पामचे डॉ.रुपाली गोसावी, डॉ.घेरडे, डॉ.पुप्पुलवार, डॉ.आर.एम.पाटील, डॉ.राम सांगळे, डॉ.रवि गोसावी, डॉ.नितीन हांडे, डॉ.पावडे, डॉ.एम.बी. चौधरी आदी प्रतिनिधी उपस्थित होते.