मुंबई – मुंबईच्या आकर्षणात महाराष्ट्राला स्वत:ची वेगळी ओळख करुन देणारी डबर डेकर बस आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. या बसच्या देखभालीसाठी येणारा अधिक खर्च आणि मुंबईच्या रस्त्यांवरील अपुरी जागा, यामुळे ही बससेवा बंद करण्याचा निर्णय बृह्नमुंबई इलेक्ट्रीक सप्लाय आणि ट्रान्सस्पोर्ट म्हणजेच ‘बेस्ट’ने घेतला आहे. सध्याच्या बसच्या तुलनेत या बसच्या देखभालीसाठी दुप्पट खर्च येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. तसेच ऑक्टोबर 2023 पर्यंत ही बससेवा बंद होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सन 1947 ते 48 या कालावधीत सुरुवातीला मुंबईत 141 डबल डेकर बस धावत होत्या. त्यानंतर, या बसेसची वाढती लोकप्रियता आणि गरज लक्षात घेऊन आणखी बसेस खरेदी करण्यात आल्या. सन 1993 पर्यंत या बसेसची संख्या 882 पर्यंत पोहोचली होती. मात्र, मुंबापुरीच्या वाहतुकीत झालेला मोठा बदल, खासगी वाहतूक आणि जागेची मर्यादा असल्याने सद्यस्थितीत बेस्टकडे केवळ 120 डबल डेकर बसेस आहेत. विशेष म्हणजे सध्या मुंबईतील 7 मार्गांवरच या बसेस धावत आहेत. त्यापैकी डिसेंबर 2020 पर्यंत 72 बस बंद करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत 48 बस ऑक्टोबर 2023 पर्यंतच सुरू राहतील, असे बेस्टमधील एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे ऑक्टोबर 2023 नंतर मुंबईची विशेष ओळख असणारी डबल-डेकर बस आठवणींचा रिव्हर्स गेअर टाकून इतिहास जमा होणार आहे.