नवी मुंबई : महानगरलिका कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागामध्ये सेक्टर 12 डी, रामनगर येथील घर क्र. 1201 मध्ये दौलत मुरेकर व भीकाजी घोलवड यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतेही पूर्व परवानगी न घेता अनाधिकृतपणे वाढीव आर.सी.सी. बांधकाम सुरू केले होते. या बांधकामास कोपरखैरणे विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. तरीदेखील हे अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवण्यात आले होते.
त्यामुळे या अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत धडक मोहिमेचे आयोजन करून झालेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या धडक मोहिमेसाठी अतिरिक्त आयुक्त शहर श्री. रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगेरे यांच्या नियंत्रणाखाली, कोपरखैरणे विभाग अधिकारी श्री. अशोक मढवी आणि सहकारी अधिकारी, कर्मचारी यांनी 05 मजुर, 1 गॅस कटर, 2 ब्रेकर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक यांच्या सहयोगाने ही धडक मोहिम पार पाडली.
त्याचप्रमाणे कोपरखैरणे सेक्टर 01 येथील टिंबर मार्केट मधील व्यावसायिक दुकानाच्या आजुबाजुच्या मार्जिनल स्पेसमध्ये मोठया प्रमाणात व्यवसाय करताना निदर्शनास आल्याने या ठिकाणी कोपरखैरणे विभाग कार्यालयामार्फत 1 जेसीबी, 10 लेबर व गॅस कटरच्या सहाय्याने सर्व पत्राशेड जमिनदोस्त करण्यात आले.
यापुढील काळातही अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे या विरोधातील धडक मोहिमा महापालिका आयुक्त यांचे निर्देशानुसार प्रभावीपणे राबविल्या जाणार आहेत.