नवी मुंबई : सारसोळे जेटीवर महापालिका प्रशासनाने बसविलेला ‘हायमस्ट’ महिन्यातून दोन दिवस चालू तर २८ दिवस बंद असतो. मासेमारीसाठी सारसोळे खाडीत जाणार्या सारसोळे ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी प्रकाश पुरविण्यास महापालिका प्रशासनाला मर्यादा पडत असतील तर तो बिनकामाचा हायमस्ट तेथून हलवावा अशी संतप्त मागणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आणि प्रभाग ८५ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी प्रभाग समितीच्या बैठकीत करत पालिका प्रशासनाच्या हायमस्ट कारभाराची लक्तरे वेशीवर मांडली.
पामबीच मार्गावर सारसोळे जेटी आहे. या जेटीवर महापालिका प्रशासनाने बसविलेला हायमस्ट कुचकामी ठरला असून हा हायमस्ट नेहमीच बंद असतो. यामुळे सारसोळेच्या मासेमारी करणार्या ग्रामस्थांना रात्रीच्या अंधारातच मासेमारीसाठी ये-जा करावी लागते. सारसोळे ग्रामस्थांना कराव्या लागणार्या समस्येचा सामना पाहून अखेरीस नगरसेविका सुजाताताई पाटील यांनी ग्रामस्थांच्या भावनांना सभागृहात मोकळी वाट करून देताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत समस्येचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
यापूर्वी अंधारामुळे सारसोळेच्या चार ग्रामस्थांची १४ जाळी अज्ञात समाजकंठकांनी जाळली होती. यामुळे ग्रामस्थांचे अंदाजे ४ लाख ९० हजार रूपयांचे नुकसान झाले. सारसोळेच्या ग्रामस्थांना अंधारामुळे नेहमीच जेटीवर विवीध समस्येचा सामना करावा लागतो. जेटीवर रात्रीच्या अंधारात साप, नाग व अन्य जनावरांचा वावर असल्याने जीव धोक्यात ठेवूनच रात्री-अपरात्री ग्रामस्थांना ये-जा करावी लागते. भरती-ओहोटीचे गणित सांभाळत सारसोळेच्या ग्रामस्थांना रात्री-अपरात्री ये-जा करावी लागत असल्याने उद्या त्यांच्या जिविताला अंधारामुळे काही अपाय झाला तर जबाबदार कोण राहणार असेही सुजाताताई पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सारसोळेच्या ग्रामस्थांच्या जेटीच्या माध्यमातून लाईट पुरवा अन्यथा कुचकामी ठरू पाहणारा हायमस्ट त्या ठिकाणाहून तात्काळ हलवा अशी संतप्त मागणी नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील यांनी केली.