नवी मुंबई : बांधकाम व्यवसायातील दलालांनी सिडको इमारतींच्या पुनर्विकासाबाबत आम्हाला शिकवू नये, असा पलटवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांच्यावर केला आहे.
पाटकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेवून नवी मुंबईतील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींचा पुनर्विकास राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळे रखडल्याचा बिनबुडाचा आणि बिनडोक्याचा आरोप केला. या आरोपांच्या जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी चिंधडया उडविल्या आहेत. सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना चांगल्या योजनेतून कायमस्वरुपी दर्जेदार घरे मिळावीत, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सातत्याने प्रयत्नशील आहे. लोकनेते गणेश नाईक यांच्या सुचनेनुसार शास्त्रीय पध्दतीने इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार केल्याने या आधारे या इमारतींच्या पुनर्विकासासाठी अडीच एफएसआय मिळाला. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी ट्रान्झिट कॅम्प मिळावेत, यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच मागणी करुन सिडकोकडे पाठपुरावा सुरु ठेवला आहे. लोकप्रतिनिधी, पालिका अधिकारी आणि सर्व घटकांना विश्वासात घेवून लोकनेते गणेश नाईक यांनी या शहराचा कारभार करीत असल्याने नवी मुंबईने नेत्रदिपक विकास केला आहे. या शहर विकासावर अनेक राज्य आणि राष्ट्रीय मानाच्या पुरस्कारांची मोहोरही उमटली आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली नवी मुंबईत काही लोकांनी फायनान्सरांकडून मोठया प्रमाणावर अगोदरच पैसा उचलला आहे. आता पुनर्विकास होत नसल्याने या फायनान्सर मंडळींनी पैशासाठी त्यांच्यामागे तगादा लावला आहे. परत देण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे आलेल्या नैराश्येतून असे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, काही ठिकाणी जास्त पैशाचे आमिष दाखवून या मंडळींनी रहिवाशांना घरे खाली करण्यास सांगितली आहेत. मात्र पुनर्विकास होत नसल्याने या रहिवाशांचा संताप या स्वार्थी लोकांनी ओढावून घेतला आहे, असे जिल्हाध्यक्ष सुतार यांनी सांगितले. ज्या बिल्डरांची बैठक झाली असे पाटकर सांगतात त्या बिल्डरांची नावे त्यांनी उघड करावीत, असे जाहिर आव्हानच जिल्हाध्यक्ष सुतार यांनी पाटकर यांना दिले आहे. त्यामुळे सिडको इमारतींमधून राहणार्या रहिवाशांचा हितचिंतक कोण आणि हितशत्रू कोण? जे जनतेला चांगलेच माहित आहे, असा टोला जिल्हाध्यक्ष सुतार यांनी लगावला आहे. मात्र ज्यांना रहिवाशांच्या भल्याची चिंता नसून पुनर्विकासात आपली भागिदारी कशी होईल, दलाली कशी वाढेल हिच पोटापाण्याची चिंता आहे, असे लोक राष्ट्रवादीवर खोटारडे आरोप करुन जनतेची दिशाभूल करुन आपली राजकीय आणि मलिद्याची पोळी भाजून घेत आहेत, असा घणाघात जिल्हाध्यक्ष सुतार यांनी केला आहे.