२१व्या शतकाचे प्रतिनिधीत्व करणारे विकसित नवी मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लोकनेते गणेश नाईक यांचे एक अतुट नाते आहे, जे नाते शरीर व श्वासाचे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईतील गणेश नाईक व त्यांचा परिवार हा नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू राहीलेला आहे. आताही गणेश नाईक आमदार व मंत्री नसतानाही गेल्या काही महिन्यापासून गणेश नाईकांच्या भावी राजकीय वाटचालीबाबत सातत्याने वावड्या उठत आहे. राजकारणात कोणत्याही पदावर नसतानाही सातत्याने चर्चेत राहणे हीच लोकनेते गणेश नाईकांची खरी ताकद आहे. मोदी लाटेत झालेल्या ऑक्टोबर २०१४ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत अल्पशा मतांनी गणेश नाईक पराभूत झाले. नवी मुंबईचा सिंह घायाळ झाला व काही काळ आरामासाठी गुहेत जावून बसला. सिंह पराभवाच्या जखमांनी घायाळ झालाच नव्हता. घायाळ झाला होता तो कृतघ्न नवी मुंबईकरांच्या भूमिकेमुळे. ज्या माणसाने आपल्या आयुष्यातील चार दशकाहून अधिक काळ या शहराच्या आणि या शहरातील नागरिकांच्या विकासासाठी घालविली, त्या शहरातील नागरिकांनी लाटेच्या आहारी जावून भूमिका बदलावी, आपण केलेल्या विकासकामांचा त्यांना विसर पडावा याचेच शल्य त्या सिंहाला जाणवले. या पराभवामुळे लोकनेते गणेश नाईकांचे जितके नुकसान झाले, त्याहून अधिक नुकसान झाले ते या नवी मुंबई शहराचे आणि नवी मुंबईकरांचे. महाराष्ट्राच्या राजकारणात गणेश नाईक वावरतात, त्यावेळी स्वपक्षातील तसेच विरोधी पक्षातील लोक बोलायचे, नवी मुंबईचे राजे आले. या पराभवामुळे राजकीय वर्तुळातही नवी मुंबईकरांबाबत चांगले बोलले जात नाही. ज्यांनी विकासकामे केली, त्यालाच नवी मुंबईकरांनी घरी बसविली. यामुळे विकासकामे करणार्यांच्या बाबतीतही नवी मुंबईकर कृतघ्नपणा दाखवू शकतात, हा संदेश महाराष्ट्राच्या राजकारणात ऑक्टोबर २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर गेला आहे. आपण केलेल्या कृत्याचा आता नवी मुंबईकरांना नक्कीच पश्चाताप होत आहे, पण आता पश्चाताप करून काहीही फायदा नाही. आपण केलेल्या चुकीचे फळ आपणास पाच वर्षे हे भोगावेच लागणार आहे. ही लोकशाही आहे. येथे निवडणूकांसाठी पाच वर्षांची प्रतिक्षा करावीच लागते. विश्वासघातांच्या जखमांनी घायाळ झालेला सिंह काही काळ आरामासाठी गुहेत गेला असला तरी या सिंहाच्या नवी मुंबईकरांच्या आणि नवी मुंबईच्या विकासाबाबतच्या भूमिकेत व असलेल्या पोटतिडकीमध्ये तसूभरही बदल झाला नाही. नवी मुंबईकरांनी मोदी लाटेच्या आहारी जात कृतघ्नपणा दाखविला असला तरी लोकनेते गणेश नाईकांचे या शहरावरील व येथील नागरिकांवरील प्रेम किंचितही कमी झालेे नाही. आपण विधानसभा निवडणूकीत केलेल्या चुकांची जाणिव नवी मुंबईकरांना दोन-तीन महिन्यातच झाली. परंतु तोपर्यत वेळ निघून गेली होती. कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. आपल्याच राजाला आपण घायाळ केल्याच्या व्यथांनी नवी मुंबईकरही घायाळ झाले. आपल्या कृतघ्नपणाची वेदना त्यांना जाणवू लागली होती. त्यामुळेच एप्रिल २०१५ साली झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत नवी मुंबईकरांनी गणेश नाईकांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवित नवी मुंबई महापालिकेची सत्ता गणेश नाईकांच्या पर्यायाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्वाधीन केली. नवी मुंबईच्या लोकनेत्यांनी महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विकासाचा वारू चौखूर उधळला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यत महापालिका सभागृहात लोकनेते गणेश नाईकांची सत्ता असल्यामुळे विकासकामांमध्ये सातत्य राहीले आहे. सुविधांचा डोंगर उभा करता आला आहे. समस्यांचे लवकरात लवकर निवारण करणे शक्य झाले आहे. विधानसभा निवडणूकीनंतर लोकनेते गणेश नाईक पडद्याआडून नवी मुंबईच्या विकासाची सूत्रे हलवित असले तरी त्यांनी आता प्रत्यक्षात पडद्यावर येवून काम केले पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे. घायाळ झालेला सिंह काही क्षण विसाव्यासाठी गुहेत जाताच जनाधार नसलेल्या आणि नवी मुंबई शहरासाठी काहीही न केलेल्या तथाकथित घटकांची कोल्हेकुई आता वाढीस लागली आहे. आपणच या शहराचे कर्तेधर्ते असल्याच्या थाटात ही कोल्हेकुई आता जनसामान्यातही वावरू लागली आहे. त्यामुळे वेळेची किंमत व शहराची गरज लक्षात घेता नवी मुंबईच्या लोकनेत्याला अर्थात नवी मुंबईच्या लाडक्या दादांना गणेश नाईकांना आता मैदानात उतरावेच लागणार आहे. लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यापाठोपाठ विधानसभेच्या निवडणूका आहेत. सिंह गुहेतून बाहेर येताच कोल्हे, माकडे व इतर प्राणी रस्त्यातून पळ काढतात, हा सृष्टीचा नियम आहे. नवी मुंबईकरांचा जनाधार आजही लोकनेते गणेश नाईकांच्या पाठीशी आहे. लोकनेते गणेश नाईकांच्या भेटीसाठी व आगामी विधानसभा निवडणूकीसाठी नवी मुंबईकर जनता आता आसूसलेली आहे. अत्यल्प मतांनी झालेला पराभव हा लाटेच्या आहारी गेलेल्या मूठभर नवी मुंबईकरांचा नादानपणा होता. पण त्यासाठी समस्त नवी मुंबईकरांवर नाराज होणे हे लोकनेते गणेश नाईकांकडून अपेक्षित नाही. घरातील काही व्रात्य सदस्यांनी मुर्खपणा केला म्हणून कुटूंबप्रमुखांने घरावर नाराज होवून चालण्यासारखे नाही. होय, नवी मुंबई शहर हे गणेश नाईकांचे कुंटूंब आहे. या शहरावर आणि या शहरातील माणसांवर गणेश नाईकांनी पुत्रवत प्रेम केले आहे. त्यामुळे कुटूंबप्रमुख नाराज होताच कोल्हेकुई करणारे बेडके आता छाती काढून चालण्याचे धाडस दाखवू लागले आहेत. अर्थात बेडके कितीही फुगली तरी ते सिंह बनू शकत नाहीत, हे वास्तव आहे. परंतु ही कोल्हेकुई करणारी मंडळी नवी मुंबईतील शांततेचा भंग करू लागली आहेत. मतदान घेण्यासाठी व नवी मुंबईतून विधानसभेत जाण्यासाठी जातीजातीत कलह निर्माण करू लागली आहेत. त्यामुळे लोकनेते गणेश नाईकांनी आता मैदानात उतरणे काळाची गरज आहे. या शहरासाठी ती आवश्यक बाब आहे.
लोकनेते गणेश नाईकांना नवी मुंबई शहराचे शिल्पकार म्हणूनही संबोधले जात आहे. अर्थात ही उपाधी त्यांना नवी मुंबईकरांनी बहाल केलेली आहे. नवी मुंबईरूपी घराचे पालकत्व गेली काही दशके गणेश नाईक सक्षमपणे सांभाळत असल्याने नवी मुंबईकर त्यांना आदरपूर्वक ‘दादा’ या नावाने संबोधत आहेत. अर्थात कोल्हेकुई करणार्या व बेडकाप्रमाणे छाती काढून चालणार्या या राजकीय घटकांना लोकनेते गणेश नाईकांप्रती असूया असल्यामुळे गणेश नाईकांना सर्वसामान्य नवी मुंबईचे शिल्पकार संबोधतात, ते मान्य नसल्याने नवी मुंबईचे शिल्पकार केवळ सिडकोच असल्याची कोल्हेकुई करत आहेत. होय हे सर्वांना मान्य आहे. नवी मुंबई शहर हे सिडकोनेच वसविले आहे. पंरत सिडकोने नवी मुंबई शहर विकसित करताना या शहराला सिमेंटचे जंगल बनविले. या शहरामध्ये निवासी वास्तव्यासाठी तसेच उपजिविकेसाठी देशाच्या कानाकोपर्यातून लोक येथे राहू लागल्याने नवी मुंबई शहराला मिनी भारताचे रूप आले आहे. नवी मुंबईत आलेल्या सर्व जाती-धर्माच्या लोकांना एका माळेत गुंफण्याचे काम लोकनेते गणेश नाईकांनी केले आहे. या सर्वधर्मियांमध्ये प्रेमाची, विश्वासाची व आपुलकीची भावना लोकनेते गणेश नाईकांनीच जागृत केलेली आहे. त्यामुळे सिमेंटच्या ठोकळ्यामध्ये नवी मुंबई घडविणार्या शिल्पकारांपेक्षा सर्वधर्मियामध्ये समतेची, मानवतेची व प्रेमाची भूमिका बजाविणारे लोकनेते गणेश नाईकच आम्हा नवी मुंबईकरांसाठी आजही नवी मुंबई शहराचे शिल्पकारच आहेत.
१९९० साली, १९९५ साली लोकनेेते गणेश नाईक विधानसभेत मताधिक्क्याने निवडून आले. १९९९ साली लोकनेते गणेश नाईक पराभूत झाले. त्यानंतर २००४ आणि २००९ साली लोकनेते गणेश नाईक विजयी झाले. २०१४ साली झालेल्या निवडणूकीत गणेश नाईक पराभूत झाले. परंतु १९९९ आणि २०१४ साली झालेल्या पराभवामध्ये विरोधाभास आहे. १९९९ साली विजयी होण्याची घोषणा करण्याचाच अवकाश असताना तत्कालीन मातब्बर शक्तींनी वाशीतील कांदा बटाटा मार्केटमधील मतदान केंद्रावर मनगटी ताकदीच्या बळावर होत्याचे नव्हते करून टाकले व विजयाचे पराभवात रुपांतर झाले. हा पराभव जनतेने घडवून आणला नव्हता. तर राजकारणातील बाहूबली शक्तींनी घडवून आणला होता. परंतु २०१४चा निसटता पराभव हा खर्या अर्थाने लोकनेते गणेश नाईकांना व्यथित करणारा होता. ज्या शहरासाठी आयुष्य वेचले त्या शहरातील माणसांनी लाटेच्या आहारी जावे याचेच शल्य आयुष्यभर लोकनेेते गणेश नाईकांना टोचत आहे.
कोल्हेकुई करणार्या राजकीय घटकांचा वाढता वावर हा नवी मुंबई शहरासाठी हितावह नसल्याने या शहराचे आजही पालकत्व असणार्या गणेश नाईकांनी आता मैदानात उतरावे असा टाहो आता खुद्द नवी मुंबईकरांकडूनच फोडला जात आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूकांना अजून थोडा अवकाश आहे. नवी मुंबईकरांनी कोणत्या पक्षावर नाही तर लोकनेते गणेश नाईकांवर आहे. गणेश नाईक पूर्वी शिवसेनेत असताना आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कार्यरत असताना गणेश नाईकांवरच नवी मुंबईकरांवर प्रेम केले आहे. नवी मुंबईकर गणेश नाईकांना जाणतात, त्यांच्या विकासकामांना जवळून ओळखतात, त्यामुळेच नवी मुंबईकर गणेश नाईकांना मानतात. नवी मुंबईकरांची तळमळ ओळखून नवी मुंबईच्या राजाने आता राज्यात वावरले पाहिजे. जनसामान्यात फिरले पाहिजेच. प्रभागाप्रभागात जावून रस्त्यावर उतरून नवी मुंबईकरांशी सुसंवाद वाढविला पाहिजे. जनतेशी गणेश नाईकांची नाळ जोडली गेलेली आहे, ती कधीही तुटणार नाही. मात्र घायाळ सिंह विसाव्यासाठी गुहेत जाताच स्वपक्षातील काही जण बिभिषण बनले आहेत. तेच स्वत:ला जंगलाच्या राजाचे राजकीय वारसदार समजून बेडून उड्या मारू लागले आहे. राजा हयातॅीत असतानाच स्वत:च्या राज्यभिषेकाचे स्वप्न पाहू लागले आहेत. विरोधकांचा सामना मैदानावर कधीही करता येईल, पण आपल्याही पक्षातील बेडूक उड्या मारणार्या व जंगलाचे उत्तराधिकारी होवू पाहणार्या बेडकाचा व माकडांचाही समाचार लोकनेते गणेश नाईकांना घ्यावा लागणार आहे. दादा, एकच सांगतो, आम्ही नवी मुंबईकर केवळ तुम्हाला जाणतो व मानतो, तुमच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर आमचा विश्वास आहे. तुम्ही कोणत्या पक्षात आहात अथवा कोणत्या पक्षात जाणार आहात याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. जंगलच्या राजाने जंगलाच्या रक्षणासाठी जंगलात खुलेआमपणे वावरलेच पाहिजे. अन्यथा राजकीय स्वार्थापायी अथवा कुवत नसलेल्या राजकीय महत्वाकांक्षेपायी विरोधातील तसेच आपल्यातील काही मंडळी जंगलात वणवा पेटवून जंगलाचा नाश करण्याची दाट शक्यता आहे. हे टाळण्यासाठी दादा, आता तुम्हाला मैदानात उतरावेच लागेल. आपण आमच्या भेटीला यावे म्हणून आता आम्हीच तुम्हाला साकडे घालत आहोत.
:- संदीप मेहेर