कॉंग्रेसमधील गटबाजीमुळे लहान मुलांना पदपथावर द्यावी लागली चित्रकला परिक्षा
नवी मुंबई : नवनियुक्त अध्यक्षांची परवानगी न घेता आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील स्पर्धकांना वाशी येथील काँग्रेस भवनमधून बाहेर काढल्यानंतर युवक काँग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत यांनी ही स्पर्धा भवनासमोरील वाशी सेक्टर ७ मधील भर रस्त्यावर घेऊन गांधीगिरी केली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. त्याची चर्चा सध्या सुरू आहे.
नवी मुंबईतील काँग्रेसमधील मतभेद जगजाहीर आहेत. प्रत्येक पदाधिकारी व नगरसेवक हे स्वयंभू असून कोणाचा पायपोस कोणात नाही. माजी अध्यक्ष दशरथ भगत यांनी उपमहापौर निवडणुकीत बंडखोरी केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी न करता त्यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यांच्या जागी वाशीतील माजी उपमहापौर अनिल कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भगत यांचे पुतणे निशांत भगत हे नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. पालिकेतील स्वीकृत सदस्य पदावरून या दोघांचे आता चांगलेच बिनसले आहे. त्यामुळे भगत यांच्या पुतण्याने रविवारी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेला कौशिक यांनी आक्षेप घेतला. ही स्पर्धा वाशी सेक्टर ७ मधील काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी नवी मुंबईतून दीडशेपेक्षा जास्त स्पर्धेकांना हजेरी लावली होती.
भवनमधील स्पर्धेची परवानगी न घेतला आयोजित केल्याने कौशिक यानी तेथील सुरक्षा रक्षकांना फर्मान पाठवून स्पर्धेसाठी व्यवस्था करण्यात आलेले साहित्य भवनाबाहेर काढण्यास सांगितले. विनापरवानगी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने कौशिक यांना राग आला होता. अखेर गांधी विचारावंर आयोजित करण्यात आलेल्या या निबंध स्पर्धेतील स्पर्धेकांची व्यवस्था भवनासमोरील अंतर्गत रस्त्यावर करण्यात आली.
अशा प्रकारे युवक काँग्रेस अध्यक्षाने नवी मुंबई अध्यक्षाला गांधिगिरीची शिकवण दिली. या संदर्भात कौशिक यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
************************************************
गांधी विचारांवर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तरीही अध्यक्षांनी परवानगीची विषय प्रतिष्ठेचा करून साहित्य बाहेर फेकण्यास सांगितले. काँग्रेस ही कोणा एकाची मक्तेदारी नाही. तो एक विचार आहे. त्यालाच अध्यक्षांनी तिलांजली दिली. त्यामुळे त्यांना सद्बुद्धी यावी यासाठी भर रस्त्यावर गांधीगिरी करावी लागली. – निशांत भगत, अध्यक्ष, नवी मुंबई युवक काँग्रेस