अयोध्येत राममंदिराची उभारणी करणे सरकारला जमत नसेल, तर तसे जाहीर करावे. आम्ही ते उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात केली.
पक्षाच्या या ५२व्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली, पण त्यांची भाषा संयत होती. युती तोडण्याबाबत त्यांनी ठोस उल्लेख केला नसला, तरी हिंदुत्वासाठीच आम्ही सत्तेत आहोत, असे सांगत जनतेच्या प्रश्नांवर सरकारशी संघर्षही कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘अच्छे दिन’चे नारे देत सत्तेवर आलेल्या सरकारने नंतर त्या सर्व घोषणा म्हणजे ‘जुमलेबाजी’ होती, असे निर्लज्जपणे जाहीर केले. मग आता राममंदिर हासुद्धा जुमलाच होता का, असा बोचरा सवालही ठाकरे यांनी केला. राममंदिर रखडल्याचा जाब सरकारला विचारण्यासाठी मी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहे, असेही उद्धव यांनी जाहीर केले. पंतप्रधानपदी आल्यापासून गेल्या साडेचार वर्षांत मोदी एकदाही अयोध्येला का फिरकले नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
बाबरी मशीद पडून इतका काळ लोटला. कोणीही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्रीपदी आला तरी महागाईचा रावण तसाच उभा राहतो पण राम मंदिर काही उभे राहत नाही. ‘मंदिर वही बनाएंगे’ असा नारा दिला जातो, मात्र ‘तारीख नही बताएंगे,’ हाच पवित्रा कायम असतो, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
सरकारवर सतत टीका करणारी शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही, या प्रश्नाचा उल्लेख करून त्यांनी उलट सवाल केला की, ‘‘भाजप सत्तेत येण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रयत्न कारणीभूत आहेत. मग ते भाजपला आता सत्तेतून बाहेर का काढत नाहीत, असा प्रश्न त्यांनाही कुणी का विचारीत नाही?’’
देशात कुणीही हिंदुत्वाबद्दल बोलत नव्हते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला. आजही देशातला हिंदू मेलेला नाही. हिंदू आणि मराठी माणसासाठी लढणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, असेही ठाकरे म्हणाले. राम मंदिराच्या उभारणीचा विषय काढल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे ठाकरे यांनी अभिनंदन केले.
जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी केंद्रातील सरकारवर टीका करीत असलो तरी नरेंद्र मोदी हे काही आमचे दुश्मन नाहीत. तुमचा पराभव व्हावा आणि आम्ही तिथे बसावे अशी काही आमची इच्छा नाही. सरकारवर टीका करूनही हिंदुत्वासाठी शिवसेना भाजपसोबत आहे, असे सूचक विधान करीत उद्धव यांनी सर्व राजकीय पर्याय खुले ठेवले. पुढील राजकीय वाटचाल कठीण आहे. अग्निपथ आहे. शिवसैनिकांनी दिल्लीत भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
मोदी सरकारने काश्मीरला संपूर्ण देशापेक्षा वेगळी आणि विशेष वागणूक देणारे घटनेचे कलम ३७० रद्द करण्यासाठी लोकसभेत ठराव आणावा, अशी मागणीही त्यांनी केली. हिंदूंच्या सणांवर नियमांची सक्ती केली जात असल्याचेही ते म्हणाले.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, रुपयाची घसरण, महागाई, दुष्काळ, अच्छे दिन यावरून ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. निवडणुकीत अशीच आश्वासने देऊन टाकली हे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे विधान निर्लज्जपणाचे असल्याचेही ठाकरे यांनी सुनावले.
खासदार संजय राऊत, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आपल्या भाषणात भाजपला गाडून टाकण्याची भाषा केली होती.
शिवसेनेचा मेळावा सुरू असतानाच व्यासपीठाच्या मागील बाजूस कार्यक्रम संयोजनासाठी उभे असलेले शिवसेना आमदार सुनील प्रभू, अजय चौधरी, जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा पोलिसांशी वाद झाला. पोलिसांनी त्यांना बळजबरीने बाहेर काढले. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि पोलीस यांच्यात वाद निर्माण झाला होता. परंतु या वेळी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला.
राफेलचे भूत भाजपच्या मानगुटीवर
राफेल विमानांच्या खरेदीवरून काँग्रेसने सुरू केलेल्या टीकेच्या सुरात शिवसेनेने सूर मिसळले. विमाननिर्मितीचा कसलाही अनुभव नसतानाही रिलायन्स कंपनीला कंत्राट कसे दिले, असा सवाल करत राफेलचे भूत भाजपच्या मानगुटीवर बसल्याची टीका ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.