नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८६ मधील नेरूळ सेक्टर सहा परिसरातील राजमाता जिजाऊ उद्यानातील खेळण्यांची मोडतोड व नासधुस करण्याची परंपरा अज्ञात समाजकंठकांनी नवरात्र कालावधीतही कायम ठेवल्याचे पहावयास मिळत आहे.
नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावच्या ग्रामस्थांसाठी सध्या तानाजी मालुसरे क्रिडांगण व राजमाता जिजाऊ उद्यान सुस्थितीत आहे. सीव्ह्यू सोसायटीलगतच्या उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांच्या माध्यमातून स्थानिक रहीवाशांच्या सोयीसाठी उद्यानात खेळणी व सुशोभीकरण आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.
गेल्या काही महिन्यापासून उद्यानातील खेळण्याची मोडतोड व नासधुस करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहे. लहान मुलांचा झोका याबाबतीत झोका घेण्याचे चामडी आसन अनेकदा कोयता, चाकू अथवा अन्य धारदार हत्याराने कापण्याचे प्रकार घडले आहेत. अनेकदा या झोपाळ्याच्या साखळ्या मोडून झोपाळा खाली पाडण्यात आला आहे. झोपाळा लहान मुलांसाठी असताना अनेकदा सभोवतालच्या गृहनिर्माण सोसायटीतील पुरूष व महिला झोपाळ्याचा वापर करत असल्याने झोपाळा अनेकदा तुटलेलाही आहे.
नवरात्र उत्सव कालावधीत झोपाळ्याशेजारी लावण्यात आलेले चार बदकांचे खेळणेही अज्ञात समाजकंठकांनी तोडून उद्यानात मूळ जागेपासून लांबवर फेकून दिले होते. सातत्याने लहान मुलांच्या खेळण्याची नासधुस व मोडतोड होत असण्याच्या प्रकारामुळे स्थानिक रहीवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.