नवी मुंबई / अमोल इंगळे
अपोलो रूग्णालयाच्या टेरेसवर पाण्याची टाकी साफ करताना जखमी झालेल्या सफाई कामगाराचा उपचारातील गलथानपणामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी अपोलो रूग्णालय व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
८ ऑगस्ट २०१८ रोजी पहाटेच्या वेळी अजित शिवराम कदम (३८) हा सफाई कामगार सीबीडी-बेलापुर येथील अपोलो रूग्णालयाच्या टेरेसवर पाण्याची टाकी सफाई करण्यासाठी गेला होता. यावेळी पहाटे ४ च्या सुमारास तोल जावून पांण्याच्या टाकीत अजित कदम पडला. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आपल्या रूग्णालयाची टेरेसवरील पाण्याची टाकी सफाई करत असताना कामगार गंभीर जखमी झाल्यामुळे या कामगाराच्या उपचाराची व त्यास पूर्ण बरा करण्याची नैतिक जबाबदारी अपोलो रूग्णालयाची होती. अपोलो रूग्णालयाने या कामगारावर मोफत उपचार करण्याची माणूसकी तर दाखविलीच नाही, उलटपक्षी त्या कामगाराच्या उपचारावर खर्च जास्त होत असल्याचे सांगत व त्या कामगारांच्या परिवाराची महागडे उपचार घेण्याची आर्थिक सक्षमता नसल्याने त्यास पुढील उपचारासाठी मुंबईतील महापालिकेच्या परळ येथील केईएम रूग्णालयात हलविण्यात आले. त्या ठिकाणी उपचार घेत असताना २३ ऑगस्ट रोजी अजित कदमचा मृत्यू झाला. बेलापुर पोलिस ठाण्यात या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
मुळातच अजित कदमच्या मृत्यूस अपोलो रूग्णालयच जबाबदार असल्याने पोलिसांनी अपोलो रूग्णालय व्यवस्थापणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शासन देणे आवश्यक आहे. हा वास्तविक अपघाती मृत्यू आहे. रात्रीच्यावेळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था न देता, जोखीम न बाळगता कामगारांना कोणत्या निकषावर पाण्याची टाकी सफाई करण्यास टेरेसवर पाठविण्यात आले. रूग्णालयाचीच पाण्याची टाकी साफ करताना ही घटना घडली असताना अन्य रूग्णालयात उपचारासाठी पाठविणे संतापजनक बाब आहे. तीन-चार दिवस उपचार करून नंतर पैसे नसल्याने अन्य रूग्णालयात हलविणे व त्यानंतर कामगाराचा मृत्यू होणे या सर्व बाबी आकलनापलिकडील आहे. त्यामुळे याप्रकरणी समस्येचे गांभीर्य जाणून घेता आपण रूग्णालय व्यवस्थापणाला या मृत्यूप्रकरणी जबाबदार धरूनच त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी निवेदनातून पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
नवी मुंबईतील अपोलो रूग्णालय हे सुसज्ज व सुविधायुक्त रूग्णालय म्हणून महाराष्ट्रात ओळखले जात आहे. या रूग्णालयात उपचारासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून लोक येत आहेत. या रूग्णालयात बाहेरून रूग्ण उपचारासाठी येत असताना याच रूग्णालयाच्या टेरेसवरील पाण्याची टाकी साफ करत असताना सफाई कर्मचारी गंभीर जखमी होतो व त्यावर उपचार करण्याऐवजी पैसे नसल्याने मुंबई महापालिकेच्या परळ येथील रूग्णालयात हलविले जाते, ही बाबच मुळातच संतापजनक आहे. अजित कदम या सफाई कामगारावर अपोलो रूग्णालयातच उपचार झाले असते तर त्याचे प्राण बचावलेे असते आणि कदम परिवारावर दु:खाचा डोंगरही कोसळला नसता. त्यामुळे उपचारात पैशाअभावी झालेला ढिसाळपणा, सुसज्ज अद्ययावत रूग्णालयातून मुंबई महापालिकेच्या रूग्णालयात हलविणे या प्रक्रियेत रूग्णाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. अपोलो रूग्णालयाने उपचार करण्यापेक्षा पैशाला प्राधान्य दिल्याने अजितला प्राण गमवावे लागले आहे. त्यातच रात्रीच्या अंधारात पाण्याची टाकी साफ करण्यास रूग्णालय व्यवस्थापणाने भाग पाडले. त्यामुळे या मृत्यूची चौकशी करून अपोलो रूग्णालय व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा असे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.