शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात अयोध्येवारीची घोषणा केली. ज्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करत शिवसेनेला डिवचले. मात्र या पोस्टरला शिवसेनेनेही तशाच प्रकारे चोख प्रत्युत्तर दिले आहे. मनसे विरोधात केलेल्या पोस्टरबाजीत टोल आंदोलनाला सेटिंगवाले टोल आंदोलन असे संबोधण्यात आले आहे. एवढेच नाही तर राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे आणि जगाला सल्ले देण्याचे यांचे धंदे असे म्हणत राज ठाकरेंवरच शरसंधान करण्यात आले आहे. पाक कलाकरांच्या विरोधाच्या नावे खुलेआम सेटिंग करण्यात आल्याचेही या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे.
मनसेने आज शिवसेना भवनासमोर लावलेल्या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरेंना अयोद्धा वारी करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र महाराष्ट्राचे रस्ते खड्डेमुक्त होणार का?, महागाई कमी होणार का? महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का? बेरोजगारांना रोजगार मिळणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का? महाराष्ट्रातला दुष्काळ संपणार का? मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का? महापालिकेतला भ्रष्टाचार संपणार का? आणि खिशातले राजीनामे बाहेर पडणार का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
मनसेने दिलेल्या या उपरोधिक शुभेच्छांना शिवसेनेकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. मनसेची आंदोलने म्हणजे फक्त सेटिंग असल्याचे शिवसेनेने त्यांच्या पोस्टरमध्ये म्हटले आहे. तसेच ज्यांचे निवडून येण्याचे वांदे आहेत असे लोक इतरांना सल्ले देण्याचे धंदे करत आहेत असाही टोला लगावण्यात आला आहे.