मुंबई:-मुंबई महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, या प्रयत्नांना कितपत यश येत आहे, हे पाहण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकार्यांनी स्वत: महापालिकेच्या शाळांची काही दिवसांपासून झाडाझडती सुरू केली आहे. शिक्षणाधिकार्यांनी स्वत: विद्यार्थ्यांच्या वह्या तपासून शिक्षणाच्या गुणवत्ता तपासण्याला सुरूवात केली आहे. शिक्षणाधिकार्यांचा हा निर्णय भूषणावह असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
महापालिकेतील शिक्षणाच्या गुणवत्तेच्या दर्जावर नेहमीच सर्वच स्तरांतून टीका होत असते. त्यामुळे पालिकेतील शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून महापालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी महेश पालकर स्वत: प्रत्येक शाळेत जाऊन गुणवत्तेची तपासणी करत आहेत. यासाठी ते स्वत: वर्गावर जाऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काय शिकवले, मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे, याची माहिती घेत आहेत. ही तपासणी करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या वह्याही तपासल्या. विद्यार्थ्यांच्या वह्या तपासण्याबरोबरच त्यांनी काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांना शिकवलेले कितपत समजले याची माहितीही घेतली. पालकर यांनी पालिकेच्या सर्व प्रभागातील शाळांची तपासणी पूर्ण केली असून, फक्त पाच प्रभागांमधील शाळांची तपासणी शिल्लक राहिली आहे. ही तपासणी येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती पालकर यांनी दिली.
महापालिकेच्या शाळांची करण्यात आलेली ही तपासणी प्राथमिक स्तरावरील असून, दिवाळीनंतर पुन्हा तपसाणी करण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल बनवून तो पालिकेला सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षणाधिकार्यांकडून करण्यात येणारी ही तपासणी योग्य आहे. परंतु, याची अतिशयोक्ती होऊन शिक्षकांना याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतल्यास हा निर्णय भूषणावह ठरेल असे मत शिक्षण क्षेत्रातील मंडळींकडून व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षणाधिकार्यांच्या कार्याचा हा भाग असल्याने त्यांनी अशा भेटी दिल्या पाहिजेत. यापूर्वीच्या कोणत्याही अधिकार्यांनी अशाप्रकारे भेटी दिल्या नव्हत्या. शिक्षणाधिकार्यांना भरपूर कामे असतात. त्यातून वेळ काढून त्यांनी अशा प्रकारे काम करणे हे भूषणावहच आहे, असे मत शिक्षण समितीचे माजी सदस्य शिवनाथ दराडे यांनी व्यक्त केले.
शाळांची तपासणी केल्यानंतर शाळेचा गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी काय बदल करावे लागणार आहे, याची माहिती लगेचच शाळा प्रशासनाला व शिक्षकांना देण्यात येत आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेशही देण्यात येत आहेत.
– महेश पालकर, शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, मुंबई महापालिका
गुणवत्ता वाढीसाठी शिक्षणाधिकार्यांनी दिलेली ही भेट योग्यच आहे. परंतु, ही तपासणी करताना शिक्षकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्यावर याचा भार पडणार नाही याची काळजीही घेणे गरजेचे आहे.
– साईनाथ दुर्गे, सदस्य, शिक्षण समिती