नवी मुंबई : लोकनेते गणेश नाईकांच्या हस्ते सोमवारी, दि. २२ ऑक्टोबर रोजी नेरूळमध्ये महानगर गॅसच्या मुख्य वाहिनीच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. नेरूळ गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या पुढाकारातून ही समस्या मार्गी लागली असून स्थानिक रहीवाशांना थेट घरगुती गॅसची सुविधा उपलब्ध होणार आहे.
नेरूळ सेक्टर २० येथील शिवशंभो मित्र मंडळ चौक, डी ब्लॉक व प्लॅट ओनर्स असोसिएशनच्या मंडपाजवळ सांयकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. नेरूळ सेक्टर २० मधील सी ब्लॉक व डी ब्लॉक येथे महानगर गॅसची पाईपलाईन टाकण्यात येणार असून उर्वरित ए ब्लॉक व सी ब्लॉक येथे हे काम प्रस्तावित असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी दिली. प्रभागातील रहीवाशांना आता गॅस नोंदणी करणे, गॅसवाला कधी येणार याची प्रतिक्षा करणे यातून सुटका होणार असल्याने या शुभारंभ सोहळ्यास स्थानिक रहीवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी केले आहे.