नवी मुंबई : रात्रीच्या वेळी काही काळ वीज बंद करत एकेकाळी अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा दणारे सारसोळे गाव आज बारबालांचा निवासी परिसर म्हणून मागील काही महिन्यापासून ओळखले जावू लागले आहे. या बारबालांच्या वाढत्या निवासी वास्तव्यामुळे सारसोळेच्या सांस्कृतिक वातावरणावर आणि युवा पिढीच्या भावी वाटचालीवर परिणाम होवू लागला आहे.
एकेकाळी कुकशेत गावामध्ये बारबालांचे निवासी वास्तव्य मोठ्या प्रमाणावर होते. कुकशेतची मिर्ची गल्ली नवी मुंबईत प्रसिध्द होती. कुकशेत गावाच्या विकासाची धुरा ही नवी मुंबईच्या राजकारणात कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून ओळखल्या जाणार्या सुरज पाटलांच्या हाती आल्यावर कुकशेत गावाची ओळख नव्याने निर्माण झाली आहे. ग्रामस्थांमध्ये जनजागृती करत कुकशेत गावातून बारबालांचे निवासी उच्चाटन करण्यात सुरज पाटलांना यश आले. अर्थात हे यश सुरज पाटलांना सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला आहे. कुकशेतची बारबालांची निवासी ओळख मिटली असली तरी कुकशेत नजीकच्या सारसोळे गावाला गेल्या काही महिन्यात बारबालांचा निवासी परिसर ही नव्याने ओळख प्राप्त झाली आहे.
सारसोळे गावातील गावठाणातील इमारतींमध्ये भाड्याने बारबाला मोठ्या प्रमाणावर निवासी वास्तव्य करत आहे. दुपारच्या वेळी सारसोळे गावातील कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावर आपण उभे राहील्यास या बारबाला कामावर जाताना आणि रात्रीच्या वेळी कामावरून येताना पहावयास मिळतात. अन्य भाडेकरूंच्या तुलनेत बारबालांकडून भाडे अधिक मिळत आहे. अलिकडच्या काळात बारबालांनी गावठाणातील सदनिका विकत घेण्याचेही प्रकार घडू लागले आहेत. बारबालांच्या वाढत्या निवासी वास्तव्यामुळे सांस्कृतिक वातावरण बिघडण्याची व गुन्हेगारी वाढण्याची भीती महिला वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. बारबालांच्या वावरामुळे युवा पिढीवर विपरीत परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
कुकशेत गाव बारबालामुक्त झाले आहे. गेल्या काही महिन्यापासून शिरवणे गावातही बारबालांच्या विरोधात चळवळ उभी राहू लागली आहे. सारसोळेच्या ग्रामस्थांनी वेळीच हा धोका ओळखून बारबालांना घरे भाड्याने देण्याचे टाळावे ही मागणी जोर धरू लागली आहे.