नवी मुंंबई : ठाणे-बेलापूर मार्गानंतर नवी मुंबईतील सर्वात महत्त्वाचा रस्ता म्हणून शीळ-महापे रस्ता ओळखला जातो. या रस्त्यावर सध्या एमएमआरडीएच्यावतीने उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरु असून या रस्त्यावरील वाढती वाहनांची संख्या पाहता हा उड्डाणपूल येत्या दोन महिन्यांत पूर्ण करुन त्याचे लोकार्पण करावे मात्र असे करत असताना कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड चालणार नाही, अशी सूचना आमदार संदीप नाईक यांनी केली आहे.
गुरुवारी आमदार संदीप नाईक यांनी या शीळ-महापे मार्गाची तसेच या मार्गावर निर्माणाधीण उड्डाणपुलाची पाहणी केली. नवी मुंबईतून शीळ-महापे मार्गे पुढे कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली भागात दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात.या मार्गावरुन दररोज हजारो हलक्या आणि जड वाहनांची वर्दळ असते.
सध्या पावसाळयात या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची सूचना त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्यांना केली. ७०० मीटर लांबीच्या या उड्डाणपुलाची पाहणी केल्यानंतर त्याचे ९० टक्के काम समाधानकारक झाल्याचे मत आमदार नाईक यांनी मांडले मात्र भविष्यात काही अडचण उद्भवू नये यासाठी लहान-सहान कामे वेळेत पूर्ण करण्याचा सल्ला अधिकार्यांना दिला. उड्डाणपुलावर चढताना आणि उतरताना सूचना फलक आवश्यक आहेत. पुरेशी विद्युत व्यवस्था हवी. हा संपूर्ण पूल कॉंक्रीटचा असल्याने भविष्यात त्यावर पाणी साचणार नाही, याची देखील दक्षता घ्यायला हवी, असे आमदार नाईक म्हणाले. पुलाच्या बाजूला आडवली-भुतवली तसेच महापे ही गावे आहेत. गावकर्यांना आपली दैनंदिन कामे करण्यासाठी डाव्या बाजूने येण्या-जाण्यासाठी रस्ता ठेवला पाहिजे आणि या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याअगोदर हा पोहोच मार्ग तयार व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. याठिकाणी होणार्या भुयारी मार्गामुळे गावकर्यांसाठी कनेक्टीव्हिटी मिळणार असल्याचे ते म्हणाले. नवीन वर्ष सुरु होण्याअगोदर या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, अशी परिस्थिती असून एक महिन्यानंतर पुन्हा एकदा मी या उड्डाणपुलाची पाहणी करणार आहे, अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली. पुढील पाहणी दौर्यात जर अगोदर केलेल्या सूचनांवर कार्यवाही झाली नसेल तर एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकार्यांशी बोलू, अशी प्रतिक्रिया आमदार नाईक यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली.