सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले असून दिवाळीनंतर कांदा आणखी महागण्याची भीती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
गेल्या ८-१० दिवसापासून कांद्याचे दर अचानक वाढल्याने आणि १६ ते १८ रूपये दराने विकला जाणारा कांदा २५ ते ३५ रूपये किलो दराने विकला जावू लागल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या विशेषत: महिला वर्गाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बाजार समिती आवारातील कांदा बटाटा मार्केटमध्ये दररोज सरासरी ९० ते १०० वाहनातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून कांद्याची आवक होत आहे तर बटाटा राज्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून दररोज सरासरी ६० ते ७० वाहनांतून विक्रीला येत असल्याची माहिती मार्केटमधील व्यापारी अशोक वाळूंज यांनी दिली.
समितीमधील मार्केटमध्ये जुना कांदा २६ ते २८ रूपये किलो या दराने तर नवीन कांदा १२ ते १६ रूपये किलो या दराने विकला जात आहे. मार्केटच्या तुलनेत हाच कांदा स्थानिक बाजारात किरकोळ स्वरूपात नवीन कांदा २० रूपये किलो या दराने तर जुना कांदा आजही २५ ते ३२ रूपये किलो या दराने विकला जात आहे.
दरवर्षी दसऱ्यानंतर मार्केटमध्ये साधारणत: नवीन कांदा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून विक्रीला येत असतो. पण अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी पडलेला मुसळधार पाऊस यामुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे दसऱ्याला विक्रीला येणारा कांदा दिवाळीनंतरच बऱ्यापैकी विक्रीला येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या मार्केटमध्ये १० ते १२ वाहनांतून विक्रीला येणारा कांदा हा सोलापुर, हुबळी या भागातून येत आहे तर जुना कांदा हा पुणे, नाशिक या भागातून ६५ ते ८० वाहनातून दररोज विक्रीला येत आहे. चाळणीमध्ये जपून राहीलेला जुना कांदा हा संपत आल्याने ग्राहकांना यापुढे नवीन कांद्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यातच नवीन कांदा आवकचे प्रमाण तुलनेने नगण्य असल्याने ग्राहकांना काही दिवस महागड्या दरानेच कांदा खरेदी करावा लागणार आहे. समिती आवारातील मार्केटमध्ये विकला जाणारा कांदा आणि स्थानिक मार्केटमध्ये विकला जाणारा कांदा यात किलोमागे ४ ते १० रूपयांचा फरक असतो.