मुंबई : बीफबंदी, बोकडनिर्यात बंदीपाठोपाठ मुंबई शहरातून धावणार्या कोंबडी वाहतुकीच्या गाड्यांवर निर्बंध लादून पोल्ट्री उद्योगाच्या मुळावर घाला घालणाऱ्या धोरणाचा आग्रह आता सत्ताधारी भाजपने धरला आहे. शिवसेना सत्तेत असलेल्या मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे पोल्ट्री वाहतुकीवर बंदीची मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे भाजपच्या या मागणीला पालिकेच्या घनकचरा विभागाने अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच कोंबडी वाहतुकीवर बंधने येणार असल्याचे समजते. तसेच कोंबडी वाहतुकीतील स्वच्छतेची मागणी करणारे समाजसेवक फारुक धाला आणि इरफान माचीवाला यांच्या वर्षभरापूर्वीच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
मुंबई शहरात दररोज सुमारे १८ ते २० लाखांहून जास्त गावरान व ब्रायलर कोंबड्यांची ठाणे, पनवेल व राज्याच्या अन्य भागातून आयात होते. या कोंबड्या उघड्या लोखंडी जाळीच्या वाहनांमधून शहरात आणल्या जातात. गाड्यांमध्ये कोंबड्यांच्या विष्ठेसाठी कोणतीही सुविधा नसल्यामुळे ही विष्ठा रस्त्यावर पडते. या विष्ठेची दुर्गंधी मुंबईकरांना सहन करावी लागते. अशा तक्रारी पालिकेच्या विभाग कार्यालयात दररोज येतात. कोंबड्यांच्या विष्ठेमुळे पसरणार्या दुर्गंधीमुळे मुंबईकरांना रोगराईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप भाजपचे मुलुंड येथील नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केला आहे. या वाहनांमुळे होणारी दुर्गंधी थांबवण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्वत: लक्ष घालण्याची मागणी गंगाधरे यांनी एका पत्राद्वारे केली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई महापालिकेने शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले आहे. पण, दररोज कोंबड्यांची वाहतूक करणार्या वाहनांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोंबडी वाहतूक गाड्यांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात यावे. यात कोंबड्यांची वाहतूक करताना, मुंबईकरांना त्रास होणार नाही. त्यांच्या विष्ठेची योग्य विल्हेवाट लावणे व पालिकेच्या नियमांचे पालन न करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी धोरण निश्चित करण्यात यावे, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते इरफान ढाला यांनी केली आहे.
जर कोंबड्यांच्या वाहतुकीमुळे शहर अस्वच्छ होणार असेल तर, अशा गाड्यांवर निर्बंध घालण्यात येतील. पण, यासाठी एक नियमावली तयार करणे आवश्यक असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे. एकंदरीत या धोरणामुळे ७ हजार ५०० कोटींची वार्षिक उलाढाल असलेला उद्योग संकटात येईल, असे पोल्ट्री अभ्यासक दिपक चव्हाण यांनी सांगितले.
धाकपाडा (ता. डहाणू) येथे सिद्धार्थ भाटलेकर यांचा महालक्ष्मी पोल्ट्री फार्म असून, त्यांच्या एकूण उत्पादनात ड्रेस्ड मिटचा ८० टक्के वाटा आहे. दिल्ली उच्च न्यालयाने गाजीपूर मंडईत कोंबड्यांच्या कत्तलीवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणेसारख्या महानगरांमध्ये भविष्यात चिकन आणि जिवंत कोंबडी विक्रीवर प्रतिंबध येईल, तेव्हाच महाराष्ट्रातील ब्रॉयलर पोल्ट्रीत फॉरवर्ड इंटिग्रेशनचे काम सुरू होईल, असे ते म्हणाले.
सध्या ब्रॉयलर पोल्ट्रीकडे नव्या पिढीचा वाढता कल आहे. त्यातल्या काहींनी फार्म सुरू करण्याऐवजी ड्रेस्ड आणि फ्रोजनचे युनिट्स सुरू केले तर ते अधिक किफायती आणि उपयुक्त ठरतील असे दिपक चव्हाण म्हणाले.