सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात लोकसभा निवडणूकांचे पडघम वाजू लागले आहेत. केंद्रात सत्ताधारी असलेले भाजपा व मित्र पक्ष आपली सत्ता आणण्यासाठी पुन्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागले आहेत. सत्ताधाऱ्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याने अनेक पक्ष भाजपावर नाराजी व्यक्त करू लागले आहेत. काही पक्ष भाजपची साथ सोडून गेले आहेत. जे भाजपच्या छावणीत आहेत, तेही भाजपवर तोंडसुख घेण्याकरिता मागेपुढे पाहत नाही. गेली अडीच दशके भाजपचा मित्र असणारा शिवसेना पक्ष भाजपवर पर्यायाने मोदी-फडणवीस सरकार टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. कॉंग्रेस व त्याचे मित्र पक्ष सत्ता मिळविण्यासाठी जिवाच्या आकांताने देशाचा कानाकोपरा पिंजून काढत आहेत. २०१९ मधील एप्रिल महिन्यात होवू पाहणारी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक भाजप आणि कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेचीआणि अस्तित्वाची होवून बसली आहे.
राजकारण आणि क्रिकेट हे असे दोन विषय आहेत की त्या विषयामध्ये कोणाला फारसे समजत नसले तरी त्यावर कित्येक तास बोलण्याची आम्हा भारतीयांची तयारी असते. नवी मुंबई कार्यक्षेत्रात निवडणूका कधीही असल्या तरी बाराही महिने अगदी ३६५ दिवस राजकीय वातावरण हे तापलेलेच असते. सोशल मिडीयाचा कानोसा घेतला असता त्या त्या पक्षाचे समर्थक रात्री-अपरात्री उशिरापर्यत आपला किल्ला लढविताना पहावयास मिळतात. पाचही वर्ष आपणास हेच चित्र दिसून येईल. अगदीच विचारांची लढाई विचारांनी लढणे शक्य न झाल्यास शेवटचा पर्याय म्हणून शेलक्या भाषेचाही वापर करण्यास ही सोशल मिडीयावरील मंडळी मागेपुढे पाहत नाहीत. लोकसभेपाठोपाठ अवघ्या पाच-साडेपाच महिन्याच्याच अंतराने महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. लोकसभेसाठी राहूल गांधी देशाचा कानाकोपरा एकीकडे पिंजून काढत असताना दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील आणि त्यांचे आमदार, पक्षीय पदाधिकारी विविध विषयांवर महाराष्ट्र पिंजून काढताना राज्यातील भाजप-सेना सरकारच्या कारभाराचा पंचनामा करत त्यांच्या अपयशाचे वाभाडे काढत आहेत.
राजकारण हे नवी मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजले आहे काय अशी येथील परिस्थिती मागील काही काळापासून पहावयास मिळत आहे. पूर्वी बेलापुर विधानसभा मतदारसंघ अवाढव्य असताना विधानसभा निवडणूकीच्या फंदात कोणी पडत नसे. नवी मुंबईतून केवळ गणेश नाईक हेच उमेदवार हे नवी मुंबईकरांनी तसेच सर्वपक्षीय राजकारण्यांनी गृहीत धरलेले असायचे. परंतु २००९ साली विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होताना अवाढव्य असणाऱ्या बेलापुर विधानसभा मतदारसंघाचे पाच विधानसभा मतदारसंघात विभाजन झाले. एकट्या नवी मुंबई शहरात ऐरोली व बेलापुर असे दोन विधानसभा मतदारसंघ झाले. नवी मुंबई कार्यक्षेत्रातच दोन विधानसभा मतदारसंघ निर्माण झाल्याने हवश्या नवश्याच्याही राजकीय महत्वाकांक्षांना बळ प्राप्त होवू लागले. विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र आवाक्यात आल्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये इच्छूकांची संख्या वाढू लागली. विधानसभा मतदारसंघ लहान झाल्याने खऱ्या अर्थाने नवी मुंबईत प्रस्थापित असणाऱ्या राजकीय घटकांची विशेषत: नाईक परिवाराची डोकेदुखी वाढीस लागली. २००९साली विधानसभा निवडणूकीत ऐरोलीतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून संदीप नाईकांनी शिवसेनेच्या विजय चौगुलेंना तर बेलापुर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून भाजपच्या सुरेश हावरेंना पराभूत केले. नाईक परिवाराने राष्ट्रवादीच्या माध्यमातून नवी मुंबई बालेकिल्ला २००९च्या विधानसभा निवडणूकीमध्ये कायम ठेवण्यात यश मिळविले असले तरी मतदारसंघ लहान झाल्याने यापुढील काळात विजय सहजासहजी शक्य नसल्याचे तसेच विजयासाठी नोडनोडमधील स्थानिक मातब्बरांच्या मिनतवाऱ्या सर्वच पक्षाच्या उमेदवारांना व त्यांच्या नेतेमंडळींना कराव्या लागणार असल्याचे त्याचवेळी स्पष्ट झाले.
२०१४ साल हे पूर्णपणे मोदीमय पर्व होते. या वर्षातील राजकीय घडामोडी व उलथापालथी पाहिल्या तर नरेंद्र मोदी या नावासाठी हा कालावधी सुवर्णयुग होता, असेही म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. या काळात नरेंद्र मोदींनी देशातील सर्वच्या सर्व लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असता तर ते किमान २५० ते ३०० मतदारसंघातून विजयी झाले असते. इतकी मोदी या नावाची छाप त्या वर्षावर असल्याने त्या वर्षात झालेल्या निवडणूकांमध्ये मोदी वावटळीमुळे अनेक रथी-महारथींना पराभूत व्हावे लागले. कॉंग्रेससारख्या मातब्बर पक्षाचा तर पालापाचोळा झाला. अनेक नवख्या उमेदवारांना मोदी लाटेमुळे लॉटरी लागून त्यांच्या नावापुढे आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य अशीही उपाधी लागल्याचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पहावयास मिळत आहे.
एप्रिल २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. संजीव नाईक यांना पराभूत व्हावे लागले. शिवसेनेच्या राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. संजीव नाईक यांना २ लाख ८० हजार मतांपेक्षा अधिक मतांनी दणदणीत पराभूत केले. अर्थात हा मोदी लाटेचा करिश्मा होता. या पराभवापेक्षाही नवी मुंबईत नाईक परिवाराला पर्यायाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला तब्बल ४७ हजाराची पिछाडी मिळाली याचाच धक्का अधिक बसला. ऐरोली विधानसभा मतदारसंघात २५ हजाराची तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात २२ हजाराची आघाडी शिवसेनेच्या राजन विचारेंना मिळाली. त्यापाठोपाठ झालेल्या ऑक्टोबर २०१४ सालच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत पुन्हा मोदी लाटेचा तडाखा बसल्याने राष्ट्रवादीकरिता होत्याचे नव्हते होवून बसले आणि नवी मुंबई शिल्पकार असणाऱ्या लोकनेते गणेश नाईकांना पराभूत व्हावे लागले. भाजपच्या उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी जवळपास १३०० मतांनी गणेश नाईकांवर बेलापुर विधानसभा मतदारसंघातून निसटता विजय मिळविला. बेलापुरात मोदीरूपी अवकाळी हवामानाने बेलापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कंबरडे मोडले. ऐरोली मतदारसंघाने मोदी लाट थोपविली. आमदार संदीप नाईकांनी आपली जागा राखत शिवसेनेच्या विजय चौगुलेंना आणि भाजपच्या वैभव नाईकांना चारीमुंड्या चीत केले. विकासकामे आणि कानाकोपऱ्यात असणाऱ्या जनसंपर्कामुळे संदीप नाईकांनी मोदी लाट थोपविलीच नाही तर मोदी लाटेला ऐरोली विधानसभा मतदारसंघात वेसन घातली. गड आला, पण सिंह गेला अशी अवस्था राष्ट्रवादी कॉंग्रेसची होवून बसली.
– बाकीचा भाग उद्याच्या अंकात